समन्वय व नियोजन नसल्याने दूरसंचार, पाणीयोजना, महावितरण यांच्या सेवांवरही विपरित परिणाम झाला आहे.
गुहागर(रत्नागिरी): फेब्रुवारी २०२० पासून गुहागर-विजापूर महामार्गावरील गुहागर ते उमरोली गायकरवाडी बसथांब्यापर्यंतच्या २६ कि.मी. रस्त्याचे काम सुरू झाले. काजळी ते मार्गताम्हाने हा ७ किमीचा रस्ता सोडल्यास अनेक ठिकाणी ठेकेदाराने अर्धवट काम करून ठेवले आहे. महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केलेला आराखडा आणि प्रत्यक्ष कामामध्ये तफावत आहे. रस्त्यालगतच्या रहिवाशांच्या समस्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. समन्वय व नियोजन नसल्याने दूरसंचार, पाणीयोजना, महावितरण यांच्या सेवांवरही विपरित परिणाम झाला आहे.
गुहागर ते मोडका आगरदरम्यान रस्त्याखालून गुहागर, असगोली या गावांच्या पाणीयोजनांच्या जलवाहिन्या गेल्या आहेत. या जलवाहिन्यांची माहिती देऊनसुद्धा मनमानीपणे काम करत गुहागर कोर्टापर्यंतचा रस्ता खोदला. त्यामध्ये तीनवेळा जलवाहिन्या फुटल्या. अखेर गुहागर नगरपंचायतीसह, असगोली आणि पालशेत ग्रामपंचायतीने ठेकेदाराला काम थांबविण्याच्या सूचना दिल्या. परिणामी गुहागर कोर्टापासून सुमारे ७०० मी. चा रस्ता पूर्ण केलेला नाही.
रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे पैसे चटकन मिळतात, म्हणूनच गारतळी ते मोडकाआगरपर्यंतचा रस्ता झाल्यावर मोडकाआगर ते गुहागर कोर्टापर्यंतचा रस्ता उखडून टाकला. हा रस्ता उखडताना गुहागर आणि असगोलीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या फुटल्या. तीन दिवस असगोलीचा, दोन दिवस गुहागर नगरपंचायतीचा पाणीपुरवठा एक दिवस खंडित झाला. दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामाला सुरवात करताना गुहागर नगरपंचायतीने जलवाहिन्यांची माहिती ठेकेदाराला दिली होती.
सातत्याने जलवाहिन्या फुटल्याने अखेर नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी रस्त्याच्या कामावरील माणसांना खडे बोल सुनावले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर ठेकेदार, नगरपंचायत, असगोली ग्रामपंचायत आणि मजीप्राचे अधिकारी अशी संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये ठेकेदाराने स्वखर्चाने महामार्गाखालून जलवाहिन्या टाकून द्यायच्या तसेच भविष्यात वाढीव जलवाहिन्या टाकाव्या लागल्या तर त्यासाठीची तरतूद करून ठेवावी, असा निर्णय घेण्यात आला होता.
काम अर्धवट ठेवून गाशा गुंडाळला
जलवाहिन्यांच्या कामासह रस्ता पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराने महामार्ग प्राधिकरण, जीवन प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांकडे १५ दिवस वाहतूक बंद ठेवण्याची मागणी केली. त्याप्रमाणे ३० जुलैपर्यंत वाहतूक बंद करण्यात आली. तरीदेखील ठेकेदाराने ७०० मीटर रस्त्याच्या व जलवाहिन्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केले. काम अर्धवट ठेवून पावसाळी सुट्टीसाठी गाशा गुंडाळला. आता या अर्धवट कामाचा फटका वाहनचालकांना बसत आहे. रस्त्याची सुरक्षा पावसाळा संपेपर्यंत रामभरोसे आहे.
ठेकेदाराच्या कामावर कोणाचाच अंकुश नाही. त्यामुळे जलवाहिन्यांचे काम योग्य पद्धतीने होण्यासाठी ठेकेदाराच्या माणसांसोबत उभे राहून नगरपंचायतीला हे काम करून घ्यावे लागणार आहे.
- राजेश बेंडल, नगराध्यक्ष गुहागर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.