महाराष्ट्रातील मुलींचे पहिले निवासी कुस्ती केंद्र! 
क्रीडा

आळंदीत रंगलीये मुलींची "दंगल'

प्राजक्ता ढेकळे

महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ म्हणून कुस्ती ओळखली जाते. कुस्तीची पंढरी कोल्हापूर असले, तरी भावी पिढीतील महिला कुस्तीपटू घडवण्याचे ठिकाण म्हणून आळंदी हे तीर्थक्षेत्र नावारूपाला येत आहे. त्याचा आणि मुलींना प्रशिक्षण देणार्या दिनेश गुंडसरांच्या कार्याचा परिचय . 

आळंदीतील ज्ञानेश्‍वर महाराजांच्या मंदिरापासून पोस्ट ऑफिसच्या कार्यालयाकडे चालत गेले, की पाच मिनिटांच्या अंतरावर जोग महाराज कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा फलक आपले स्वागत करतो. महाराष्ट्रातील मुलींचे पहिले निवासी कुस्ती केंद्र! तीन मजली इमारतीच्या बाहेर उंचावर बांधलेले दोर, एका सरळ रांगेत लावलेल्या चपलांवरून तेथील कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील शिस्तीचा अंदाज येतो. पहिल्या मजल्यावर गेल्यानंतर हॉलमध्ये जमलेल्या विविध वयोगटांतील प्रसन्न मुद्रा, केसांचा बॉबकट, मजबूत बांधा.. अशा पंधरा-वीस मुली ट्रॅक पॅंट्‌स आणि जर्किन घालून हॉलमध्ये बसल्या होत्या. नुकत्याच क्रॉसकंट्री करून आल्या असल्या तरी मुलींच्या चेहऱ्यावर थकल्याचा कोणताही लवलेश दिसत नव्हता. हॉलमध्येच बसून आमच्या गप्पांना सुरवात झाली. सुरवातीची काही मिनिटे शांत बसलेल्या मुली हळूहळू खुलू लागल्या. प्रत्येकजण पुढे येऊन इथे कसे आलो, कुस्तीची आवड कशी निर्माण झाली, स्पर्धांमध्ये खेळताना कसे अनुभव येतात, कुस्तीतील कोणत्या प्रकारचा डावपेच आवडतो... यासारख्या अनेक गोष्टी मोकळेपणाने सांगू लागल्या. 

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या एकूण 42 मुली या कुस्ती केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. या सर्व कुस्तीपटू नऊ ते अठरा- एकोणीस या वयोगटातील आहेत. कुस्तीविषयी असलेला जिव्हाळा या मुलींच्या बोलण्यातून जाणवतो. सोळा वर्षांची संगीता टेकाम म्हणते, ""भंडारदरा जिल्ह्यातील तुमसे तालुक्‍यातील एका छोट्याशा खेडेगावात मी वाढले. शालेय स्तरावर शिक्षण घेत असताना कुस्तीबद्दल प्रचंड आकर्षण माझ्या मनात निर्माण झाले. मी कुस्ती खेळण्याला वडिलांचा प्रचंड विरोध होता; मात्र आईचा पाठिंबा असायचा. कुस्तीबद्दल अधिक माहिती नव्हती. सुरवातीला मी मुलांबरोबर कुस्ती खेळायचे. माझ्या खेळातील चुणूक लक्षात घेऊन शाळेतील क्रीडा शिक्षकांनी मला आळंदीला पाठवले. या प्रशिक्षण केंद्रात मिळालेल्या प्रशिक्षणामुळे राज्यस्तरीय सुवर्णपदक मिळाले. मला राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली.'' 

सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर तालुक्‍यातून आलेली हर्षदा सांगते, ""शालेय स्तरावर असताना मी कुस्ती खेळायचे; परंतु त्यातील अचूक डावपेच मात्र माहिती नव्हते. जेव्हा आम्हाला आळंदीतील या प्रशिक्षण केंद्राविषयी कळले, तेव्हा कुटुंबीयांनी मला या ठिकाणी पाठविण्याचे निश्‍चित केले. गावातील लोकांनी खूप नावे ठेवली. कुस्ती काय मुलींचा खेळ आहे का? मुली नाजूक असतात.. असे काहीबाही माझ्या कुटुंबीयांना सांगण्यात आले. पण, मला इकडे पाठविण्याच्या निर्णयावर माझे कुटुंबीय ठाम होते. येथे प्रशिक्षण घेऊन मी सतरा वर्षे वयोगटात सुवर्णपदक मिळवले, तेव्हा मात्र सगळ्यांनी माझे कौतुक केले.'' 

""भावाबरोबर कुस्तीच्या आखाड्यावर कुस्ती बघायला मी नेहमी जायचे, त्यातूनच मला या खेळाची आवड निर्माण झाली. मग मी भावांबरोबर कुस्ती खेळू लागले, शालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. मात्र, खेळातील कोणत्याही तांत्रिक गोष्टीविषयी काही माहिती नसल्यामुळे त्या ठिकाणी मी अपयशी ठरू लागले. पुढे टीव्हीवर अंकिताताईची मुलाखत बघितली आणि कुटुंबीयांनी मला इथे पाठविले. योग्य व अचूक प्रशिक्षणामुळे मी आज गुजरात, रांची, खांडवा याठिकाणी राष्ट्रीय स्तरावर कुस्तीत चांगली कामगिरी करू शकले,'' असे नागपूरची ओमेश्‍वरी बस्ती सांगते. या प्रशिक्षण केंद्रात सराव करणाऱ्या बहुतांश मुली शेतकरी कुटुंबातून आलेल्या आहेत. 

नव्या ध्येयाकडे वाटचाल... 
आगाशे कॉलेजमधील ज्युनिअर प्राध्यापकाची नोकरी व आळंदीत गणित आणि अकाउंटंसीचा 700 विद्यार्थी असलेला स्वतःचा क्‍लास अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सुरू होता. मात्र, कुस्तीविषयीची आत्मीयता आणि प्रेम त्यांना शांत बसू देत नव्हते. शेवटी रूटीन आयुष्यात बदल करून पूर्ण वेळ कुस्तीला देण्याचे दिनेश गुंड यांनी निश्‍चित केले. आळंदीत प्रसिद्ध असलेले आपले क्‍लास बंद करून पूर्णवेळ कुस्तीच्या खेळासाठी वाहून घ्यायचे त्यांनी ठरवले. त्यांच्या या निर्णयाला तेव्हा त्यांच्या वडिलांनी भक्कम पाठिंबा दिला. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीचे पंच म्हणून काम करणारे दिनेश गुंड यांनी पुढे 2007 मध्ये जोग महाराज मुलींच्या निवासी कुस्ती प्रशिक्षण केंद्राची सुरवात केली. मात्र, तोपर्यंत समाजातून त्यांच्या या निर्णयाविषयी मुली कधी कुस्ती खेळतात का? ताकदीचा खेळ मुलींना जमणार का? गुंड सरांच्या डोक्‍यात काय खूळ आलंय... यासारखे अनेक प्रश्‍न उपस्थित केले. मात्र, या सगळ्यावर त्यांनी मात केली. गुंड सरांच्या मुलींच्या निवासी कुस्ती प्रशिक्षण केंद्रात सुरवातीला केवळ तीन मुलींनी प्रवेश घेतला, त्यातही एक होती स्वतः गुंड सरांची कन्या अंकिता! कुस्तीचे धडे द्यायला त्यांनी आपल्या मुलीपासूनच सुरवात केली. मुलींसाठी असलेल्या या निवासी केंद्रात मुलींसाठी दिनेश गुंड यांनी सुरवातीला स्वतःजवळचे पैसे खर्च करून मॅट आणले. निवासी कुस्ती केंद्रात अंकिताला प्रोत्साहन देत, प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. हळू हळू शालेय, तालुका आणि जिल्हा पातळीवर अंकिता कुस्तीत चांगली कामगिरी करू लागली, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात या निवासी कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे नाव होण्यास मदत झाली. अंकिता व तिच्या सहकाऱ्यांची खेळातील प्रगती बघून लोक या प्रशिक्षण केंद्रात येऊन चौकशी करून मुलींना दाखल करू लागले. केवळ साडेतीन हजार रुपये इतक्‍या नाममात्र प्रवेशमूल्यामध्ये मुलींच्या राहण्याची, खाण्याची सर्व व्यवस्था या ठिकाणी त्यांनी सुरू केली आहे. आज या ठिकाणी 42 हून अधिक महिला कुस्तीपटू प्रशिक्षण घेत आहेत. 


या प्रशिक्षण केंद्राच्या सुरवातीच्या काळाविषयी बोलताना गुंड सर सांगतात, ""हे प्रशिक्षण केंद्र उभे करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे मला कुस्तीविषयी अत्यंत जिव्हाळा होता. आजही आहे. कुस्तीपटू जगदीश कालिराम यांची बहीण - पहिली महिला भारत केसरी "सोनी कालिराम'ला दिल्लीत कुस्ती खेळताना मी पाहिले आणि माझ्या मनात विचार आला, की ही अत्यंत चांगल्या प्रकारे कुस्ती खेळू शकते, तर आपल्या मुलीदेखील अत्यंत चांगल्या पद्धतीने कुस्ती खेळू शकतात. या प्रेरणेतूनच मुलींच्या कुस्ती केंद्राची सुरवात झाली. या काळात अनेक अडचणी आल्या, मात्र त्यावर मी मात केली.'' 

व्यायाम आणि आहार 
कुस्ती खेळताना शारीरिक तंदुरुस्तीबरोबर सकस आहाराची फार गरज असते. या प्रशिक्षण केंद्रात दिनेश गुंड मुलींकडून चांगला शारीरिक व्यायाम करून घेतात. या मुलींचा दिवस पहाटे साडेचार वाजता सुरू होतो. व्यायामाच्या पहिल्या सत्रात सपाट्या, जोर, डिप्स मारणे, स्प्रिंट (धावणे), इनडोअर गेम्स घेतले जातात. त्यानंतरच्या दुसऱ्या सत्रात मात्र कुस्ती खेळातील कलाजंग, चितपट, एकेरी पट, दुहेरी पट, ढाक, धोबीपछाड, सवारी यांसारखे महत्त्वाचे डावपेच अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने शिकविले जातात. शारीरिक व्यायाम करून घेण्याचे काम जरी दिनेश गुंड करत असले, तरी या व्यायामाबरोबरच सकस आहार देण्याकडे त्यांच्या पत्नी लक्ष देतात. येथे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींना शारीरिक ताकदीसाठी थंडाई (बदाम, धने, पिस्ता, खसखस, बडीशेप यांचे एकत्रित मिश्रण) प्यायला दिली जाते. याशिवाय नियमित पौष्टिक आहारावर भर दिला जातो. कोणत्याही प्रकारचा तेलकट आहार या खेळाडूंना दिला जात नाही. 

यशाचा चढता आलेख 
आतापर्यंत जोग महाराज कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून आंतरराष्ट्रीय पातळीवर सहा महिला कुस्तीगीर यांनी मजल मारली आहे. या कुस्तीपटूंमध्ये अश्‍विनी मडवी, मनीषा दिवेकर, शीतल साठे, तनुजा आल्हाद या कुस्तीपटूंचा समावेश आहे. या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या अठरा वर्षांच्या अंकिताने शालेय स्तरावर झालेल्या स्पर्धांत तीन सुवर्णपदके, एक रौप्यपदक; सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेतही एक सुवर्णपदक आणि एक रौप्यपदक; याशिवाय आशिया कॅडेट कुस्ती स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे. याबरोबरच जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धांमध्ये सलग तीन वेळा ती सहभागी झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणारी ती राज्यातील पहिलीच मुलगी आहे. याबरोबरच 16 - 18 वर्षे वयोगटातील वीस मुलींना सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साई) शिष्यवृत्ती मिळते. याशिवाय मनीषा दिवेकर या खेळाडूनेही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदा मध्य प्रदेशातील खांडवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत हर्षदा जाधवला सुवर्णपदक मिळाले आहे. 
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील महिला कुस्तीपटू दुसऱ्या स्थानावर आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारतात हरियानानंतर महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटू आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील चांगल्या महिला कुस्तीपटू एकत्र आल्या तर महाराष्ट्र अजून दुप्पट पदके मिळवू शकेल. 


मुलींच्या प्रगतीविषयी बोलताना गुंड सर म्हणतात, ""अजूनही मुलींच्या कुस्तीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप चांगला नाही. मात्र, लोकांनी हे लक्षात घ्यायला हवे, की भविष्यात भारताला ऑलिंपिकमध्ये कुस्तीतील सुवर्णपदक मुलीच मिळवून देऊ शकतील. याचे प्रमुख कारण म्हणजे मुली मुळातच जिद्दी आणि ध्येयवेड्या असतात. या मुलींना केवळ प्रोत्साहन आणि पाठबळ आवश्‍यक असते. कुस्ती या खेळावरील पुरुषांची मक्तेदारी महिला कुस्तीपटूंनी कधीच मोडीत काढली आहे, याचा प्रत्यय रिओ ऑलिपिंकमध्ये साक्षी मलिकने मिळवलेल्या सुवर्णपदकाने दिलाच आहे.'' 

शासकीय स्पर्धा 
- मुलींच्या कुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. 
- या परिषदेतर्फे वरिष्ठ महिला राज्य अजिंक्‍यपद स्पर्धा घेतली जाते. यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढले जातात. ही स्पर्धा जिंकणाऱ्या महिला कुस्तीपटूंना अनुक्रमे 2400, 1800, 1200 रुपयांची मासिक शिष्यवृत्ती मिळते. 
- खाशाबा जाधव महिला कुस्तीगीर स्पर्धेचेदेखील आयोजन केले जाते. या कुस्ती स्पर्धेमध्ये पहिल्या तीन क्रमांकांसाठी अनुक्रमे 40 हजार, 30 हजार, 20 हजार रुपये या स्वरूपात बक्षीस दिले जाते. 
- राष्ट्रीय स्तरावर तुम्ही कुस्ती खेळलात, तर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते. 
- याशिवाय जिल्हा क्रीडा कार्यालयाकडूनही या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक स्वरूपाची मदत केली जाते. 

कुस्तीमुळे करिअरला अधिक वाव 
जोग महाराज कुस्ती प्रशिक्षण केंद्रात तयार झालेल्या अनेक मुलींची उत्कृष्ट करिअर झाली आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून खेळाडूंसाठी राखीव जागांसाठी घेतलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन चांगल्या पदावर या मुली कार्यरत आहेत. यामध्ये प्रियांका बुरुंगले पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत आहे, विजया खुटवड पोलिस निरीक्षक, गीताई कटोर गटविकास अधिकारीपदावर कार्यरत आहेत. याशिवाय महाराष्ट्र पोलिस आणि रेल्वे पोलिस सेवेमध्ये 22 हून अधिक मुली कार्यरत आहेत. 

मदतीचा हात 
चांगल्या प्रकारे कुस्ती खेळणाऱ्या; परंतु केवळ आर्थिक परिस्थितीअभावी काही मुली प्रशिक्षण घेऊ शकत नाहीत. समाजातील दानशूर व्यक्तींचे हात पुढे आले, तर या मुलींचे भवितव्य नक्कीच चांगले असेल. समाजाने या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदत करावी, असे आवाहन दिनेश गुंड यांनी केले आहे. 

गरज उत्तम प्रशिक्षकाची 
जोग महाराज महिला कुस्ती प्रशिक्षणाला भारतीय क्रीडा प्रबोधिनीने उत्कृष्ट कुस्ती मॅट, जिमचे साहित्य दिले आहे. मात्र गरज आहे, ती त्या मॅटवर अचूक प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकाची! दररोज मुलींकडून कुस्तीचा सराव करून घेण्याचे काम गुंड सर करतात. मात्र स्पर्धेला मुली राज्याबाहेर घेऊन गेल्यानंतर स्पर्धेला न गेलेल्या मुलींच्या सरावाची फार मोठी अडचण निर्माण होते. यामुळे भारतीय क्रीडा प्रबोधिनीने (साई) उत्तम दर्जाचा प्रशिक्षक (कोच) द्यावा, ही मागणी गेली अनेक वर्षे दिनेश गुंड करत आहेत. यासाठी त्यांनी शासनदरबारी अनेकदा पाठपुरावाही केला आहे. मात्र, त्याची अजूनही दखल घेतली गेली नाही. 

हाडाचा मार्गदर्शक कुस्तीपटू 
दिनेश गुंड यांना कुस्तीचा खरा वारसा वडील धोंडिबा गुंड यांच्याकडून मिळाला. कुस्तीतील बारकावे, डाव, अचूक मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी घरातून मिळत होत्या; पण कुस्ती खेळण्यासाठी आवश्‍यक असलेल्या मन, मेंदू आणि मनगट या तीन गोष्टींपैकी मनगटातील ताकदीची कमतरता त्यांना जाणवत होती. यामागील मुख्य कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती! पुढे काही वर्षे कुस्ती केल्यानंतर केवळ आर्थिक अडचणींमुळे गुंड यांनी कुस्तीला रामराम केला. पुढे ही कसर त्यांनी मुलींचे प्रशिक्षण केंद्र सुरू करून भरून काढली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 2003 मध्ये घेण्यात आलेल्या राजस्तरीय पंच परीक्षेत गुंड महाराष्ट्रात पहिले आले. त्यानंतर 2007 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय पंच परीक्षेत भारतात पहिले आले. पुढे आंतररराष्ट्रीय पंच म्हणून काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतल्या गेलेल्या तीन स्तरांवरील परीक्षेतही ते उत्तीर्ण झाले. आतापर्यंत त्यांनी 23 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. जगातील मानाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "गोल्डन ग्रां प्री' स्पर्धेत त्यांनी पंच म्हणून काम केले आहे. या स्पर्धेत जगभरातील विविध नामांकित पंच आणि नामांकित खेळाडूंना बोलावले जाते. याशिवाय इस्तंबूल आणि मंगोलिया येथे खेळाडूंच्या पात्रता स्पर्धेतही त्यांनी पंच म्हणून काम केले आहे. 

पुण्यापासून साधारण वीस-एकवीस किलोमीटर अंतरावरील आळंदी हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. संतपरंपरेचा अखंड वारसा चालवणारे, हजारो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे हे स्थान, आता महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटू घडविण्याचा वारसाही गेल्या काही वर्षांपासून अखंडपणे चालवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Mobile Charging Tips : कितीही वेळ मोबाईल वापरा चार्जिंग संपणारच नाही, सोपी ट्रिक बघाच

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

SCROLL FOR NEXT