मुल्तान : कर्णधार बाबर आझम (१५१ धावा) व इफ्तिकार अहमद (नाबाद १०९ धावा) यांच्या दमदार शतकांच्या जोरावर पाकिस्तानने आशियाई क्रिकेट करंडकातील सलामीच्या लढतीत नेपाळचा २३८ धावांनी धुव्वा उडवला.
पाकिस्तानकडून मिळालेल्या ३४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या नेपाळचा डाव २३.४ षटकांत १०४ धावांवरच गडगडला. शादाब खान याने २७ धावा देत चार फलंदाज बाद करीत चमक दाखवली.
दरम्यान, याआधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. करण केसी याने फखर जमान याला १४ धावांवर बाद करीत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. त्यानंतर इमाम उल हक ५ धावांवरच धावचीत बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था सातव्या षटकांत २ बाद २५ धावा अशी होती.
बाबर आझम व मोहम्मद रिझवान या जोडीने पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ८६ धावांची भागीदारी केली. ही जोडी स्थिरावून पाकच्या धावसंख्येत मोलाची भर घालणार असे वाटत असतानाच रिझवान ४४ धावांवर धावचीत बाद झाला आणि जोडी तुटली. संदीप लॅमिचेन याने अगा सलमान याला ५ धावांवरच पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
२१४ धावांची धडाकेबाज भागीदारी
बाबर आझम व इफ्तिकार अहमद या जोडीने २१४ धावांची धडाकेबाज भागीदारी केली. बाबर याने १३१ चेंडूंमध्ये १४ चौकार व ४ षटकारांसह १५१ धावांची खेळी केली. हे त्याचे १९ वे एकदिवसीय शतक ठरले. १०२व्या डावात त्याने हे शतक साजरे केले.
हाही एक विक्रमच ठरला. इफ्तिकार याने अवघ्या ७१ चेंडूंमध्ये ११ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०९ धावांची खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक ः पाकिस्तान ५० षटकांत ६ बाद ३४२ धावा (बाबर आझम १५१ - १३१ चेंडू, १४ चौकार, ४ षटकार, इफ्तिकार अहमद नाबाद १०९ - चेंडू ७१, ११ चौकार, ४ षटकार, सोमपाल कामी २/८५) विजयी वि. नेपाळ सर्व बाद १०४ धावा (शादाब खान ४/२७).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.