पल्लिकेले - भारत-पाकिस्तान यांच्यामधील लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. आता आशियाई क्रिकेट करंडकावरच पावसाचे सावट असल्याची बातमी समोर आली आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे पुढील दोन आठवडे पावसाची शक्यता असल्याचे समजले आहे.
त्यामुळे आता प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील लढतींचे ठिकाण बदलण्यात येईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या स्पर्धेत भारत-नेपाळ यांच्यामध्ये उद्या लढत (ता. ४) होणार असून पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत फलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या भारतीय संघासाठी ही लढत महत्त्वाची असणार आहे. या लढतीवरही पावसाचे सावट आहे.
भारतीय संघाला ५० षटके तग धरता आले नाही आणि बाद झालेले सर्व फलंदाज पाकिस्तानच्या तीन वेगवान गोलंदाजांनी टिपले होते, ही बाब लक्षात घेण्यासारखी होती. पहिल्या चार खेळाडूंना वेगवान गोलंदाजांनी तिखट मारा करून बरेच प्रश्न विचारले. पाकिस्तान संघाची ताकद कशात दडली आहे याचे उदाहरण प्रत्यक्ष बघायला मिळाले. खासकरून शाहीन शाह आफ्रिदीची चेंडू मनासारखा स्विंग करण्याची हातोटी बघण्यासारखी होती.
रोहित शर्मा आणि शुभमन गिलला चेंडूचा अंदाज लागत नव्हता. विराट कोहली बाद झाला तो चेंडू त्याने अंगापासून लांब खेळला, नंतर बॅटची आतची कड घेऊन चेंडू स्टम्पवर आदळला. श्रेयसने दाखवलेली चमक अल्पजीवी ठरली. त्यामुळे फलंदाजीतील प्रश्न कायम राहिले आहेत असेच म्हणावे या वेळी लागेल.
भारतीय संघ नवख्या नेपाळसमोर सामना खेळेल. पाकिस्ताविरुद्ध झालेल्या चुका टाळून सराव करून घेण्याची संधी नेपाळ संघासमोर मिळणार आहे. जसप्रीत बुमरा वैयक्तिक कारणामुळे नेपाळविरुद्धची लढत खेळणार नाही.
आजची लढत
भारत-नेपाळ, पल्लिकेले
दुपारी ३ वाजल्यापासून
सामने इतरत्र हलवण्याच्या हालचाली
या स्पर्धेच्या संयोजनातील त्रुटी सगळ्यांना त्रास देत आहेत. एक तर तिकिटांचे दर जास्त ठेवल्याने प्रेक्षकांना सामन्याचा आनंद घेता येता नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भारत-पाक सामन्यानंतर व्यवस्थापनाने पत्रकार परिषद घेतली नाही. आता पावसामुळे कोलंबोतील सुपर फोरच्या लढती इतरत्र हलवण्याच्या हालचाली सुरु आहेत.
टिपटिप पावसाने घात
भारत-पाकिस्तान सामना पावसाने वाया गेल्याने संयोजक आणि प्रेक्षक सगळ्यांनाच निराशेचा सामना करावा लागला. पावसाने सामना रद्द होणे बघायला मिळाले होते, पण पल्लिकेले मैदानावर पडलेला पाऊस रुमाल भिजण्याइतकाच होता. रिपरिप नव्हे तर अगदी टिपटिप होता. तरीही त्याने घात केलाच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.