Athlete Sarvesh Kushare : बँकॉक येथे नुकत्याच झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत उंच उडीत रौप्यपदक जिंकणाऱ्या मराठमोळ्या सर्वेश कुशारेचे आगामी जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी तिकीट पक्के झाले आहे. बुडापेस्ट (हंगेरी) येथे १९ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेत सर्वेशची जागतिक क्रमवारीनुसार (रँकिंग) निवड निश्चित झाली.
जागतिक स्पर्धेसाठी पात्रता गाठण्याची (कामगिरी व रँकिंगनुसार) अंतिम तारीख ३० जुलै असून, २ ऑगस्टला पात्र ठरलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात येतील. उंच उडीत एकूण ३६ खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार असून, त्यापैकी कतारच्या मुताझ बारशिमला विद्यमान विजेता, तर इटलीच्या गियानमार्को तम्बेरीला डायमंड लीग विजेता म्हणून वाइल्ड कार्ड प्रवेश देण्यात येणार आहे. पुढील आठ जण कामगिरीनुसार पात्र ठरणार असून, उर्वरित २६ खेळाडू रँकिंगनुसार पात्र ठरतील.
सर्वेश सध्या १२०१ गुणांसह जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानावर असून पात्र ठरलेल्या खेळाडूंत २२ व्या स्थानावर आहे. त्यामुळेच त्याची निवड पक्की झाली आहे. जागतिक स्पर्धेसाठी २.३२ मीटर हा पात्रता निकष होता. सर्वेशने बँकॉक येथे २.२६ मीटर, तर गेल्या वर्षी गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २.२७ मीटर अशी कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला पात्रता गाठण्यासाठी जागतिक रँकिंग सुधारणे गरजेचे होते. आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेतील रौप्यपदकामुळे त्याला त्याच्या रँकिंगमध्ये सुधारणा करता आली व प्रथमच जागतिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
मोनिकानंतर दुसरा नाशिककर
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगावचा असलेला सर्वेश सेनादलात उंच उडीतील माजी आशियाई पदकविजेते जितीन थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. सर्वेशपूर्वी मोनिका अठारे या नाशिकच्या लांब पल्ल्याच्या धावपटूने जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिने २०१७ च्या लंडन स्पर्धेत मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.
गेल्या वेळी २२ खेळाडूंचा संघ
गेल्या वर्षी अमेरिकेतील युजीन येथे झालेल्या स्पर्धेत भारताचा २२ खेळाडू संघ सहभागी झाला होता. आतापर्यंत पात्रता निकषानुसार ११ जण पात्र ठरले असून सर्वेशसह नऊ जण रँकिंगच्या आधारावर पात्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे पुरुषांचा ४-४०० मीटर रिले व मिश्र ४-४०० मीटर रिले संघही पात्र ठरू शकतो. त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा यावेळचा संघ मोठा राहू शकतो.
२३ जुलैपर्यंतच्या रँकिंगनुसार पात्र ठरलेल्या अन्य खेळाडूंत संतोष कुमार (४०० हर्डल्स), अब्दुला अबुबकर (तिहेरी उडी), रोहित यादव, डी. पी. मनू (भालाफेक), ज्योती येराजी (१०० हर्डल्स), पारुल चौधरी (३००० मीटर स्टीपलचेस), शैली सिंग (लांब उडी), अनु राणी (भालाफेक) यांचा समावेश आहे. आतापर्यंत थेट पात्र ठरलेल्या खेळाडूंत नीरज चोप्रा, अविनाश साबळे, जेस्वीन अल्ड्रीन, श्रीशंकर मुरली, प्रवीण चित्रावेल, ताजिंदरसिंग तूर, प्रियांका गोस्वामी, अक्षदीप सिंग, विकास सिंग, परमजीत बिश्त, राम बाबू यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.