हांग् चौऊ : भारतीय तिरंदाजांनी गुरुवारी अचूक निशाणा साधला. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत सुवर्णपदकावर मोहोर उमटवण्यात भारताला यश मिळाले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील कम्पाऊंड प्रकारातील भारताचे हे तिसरे सुवर्णपदक ठरले, हे विशेष. ओजस देवतळे, प्रथमेश जावकर आणि अभिषेक वर्मा या खेळाडूंनी अचूक निशाणा साधत पुरुषांच्या सांघिक प्रकारात घवघवीत यश मिळवून दिले. अदिती स्वामी, परनीत कौर व ज्योती सुरेखा वेन्नम या महिला तिरंदाजांनी सांघिक प्रकारात मौल्यवान कामगिरी केली.
भारताच्या महिला तिरंदाजी संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत हाँगकाँगच्या संघावर २३१-२२० असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर अंतिम चार फेरींच्या लढतीत इंडोनेशियाच्या तिरंदाजांना २३३-२१९ असे पराभूत करीत भारतीय महिलांनी सुवर्णपदक पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली. भारतीय महिलांनी चीन तैपेईचे कडवे आव्हान २३०-२२९ असे परतवून लावत सुवर्णपदकाला गवसणी घातली. दक्षिण कोरियाने इंडोनेशियाच्या तिरंदाजांवर विजय मिळवून ब्राँझपदक पटकावले.
भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भूतानवर २३५-२२१ असा सहज विजय नोंदवला. उपांत्य फेरीच्या लढतीत चीन तैपईच्या तिरंदाजांना २३५-२२४ असे पराभूत करीत भारतीय पुरुषांनी आगेकूच केली. भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरीत बलाढ्य दक्षिण कोरियाच्या तिरंदाजांना २३५-२३० असे नमवले आणि सुवर्णपदकावर हक्क सांगितला. मलेशियन संघाने चीन तैपेई संघातील तिरंदाजांना २२८-२०८ असे पराभूत करीत ब्राँझपदकाला गवसणी घातली.
तीन पदके निश्चित
भारतीय तिरंदाजांनी आतापर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये तीन पदके जिंकली आहे. मिश्र सांघिक, पुरुष सांघिक व महिला सांघिक या तीन प्रकारांत सुवर्णपदक जिंकण्यात भारताने बाजी मारली आहे. आता पुरुषांच्या वैयक्तिक प्रकारात ओजस देवतळे व अभिषेक वर्मा यांच्यामध्ये अंतिम फेरीची लढत होणार आहे.
त्यामुळे सुवर्ण व रौप्य अशी दोन्ही पदके भारताला मिळणार आहे. शिवाय महिलांच्या वैयक्तिक प्रकारात ज्योती सुरेखा वेन्नम हिने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तिच्याकडून रौप्य किंवा सुवर्ण यांच्यापैकी एक पदक मिळू शकते. ही सर्व पदके कम्पाऊंड प्रकारातील आहेत. याचा अर्थ भारताची आणखी तीन पदके निश्चित आहेत. अदिती स्वामी ब्राँझपदकासाठी लढणार आहे; पण या लढतीत हरल्यास तिला पदकापासून दूर जावे लागणार आहे. रिकर्व्ह प्रकारात पुरुषांच्या सांघिक प्रकारात पदक मिळण्याची दाट शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.