हांग चौऊ, ता. १ ः भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रविवारी दमदार कामगिरी करीत तीन सुवर्णपदकांसह एकूण १५ पदकांवर मोहोर उमटवली. याचसह भारताने ५३ पदकांवर नाव कोरत पदक तक्त्यामध्ये चौथे स्थान कायम राखले. महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याने तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकावताना दिवस गाजवला. ताजिंदरपालसिंग तूर याने गोळाफेकीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. हे त्याचे सलग दुसरे सुवर्णपदक ठरले. भारताने दिवसातील तिसरे सुवर्णपदक नेमबाजीतील पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात कमवले.
अविनाश साबळेने ८ मिनिटे १९.५० सेकंदांत शर्यत पूर्ण करीत भारताला ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. आता तो पाच हजार मीटर शर्यतीत सहभागी होणार आहे. ताजिंदरपालसिंग तूर याने २०.३६ मीटर गोळा फेकून सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर हक्क सांगितला. कायनन चेनाय, झोरावर सिंग व पृथ्वीराज थोंडायमन या भारतीय नेमबाजांनी पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात ३६१ गुणांची कमाई करताना आशियाई स्पर्धेतील विक्रमासह सुवर्णपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली.
सात रौप्य अन् पाच ब्राँझ
भारतीय खेळाडूंनी रविवारी अक्षरश: पदकांची लयलूट केली. तीन सुवर्णपदकांसह सात रौप्य व पाच ब्राँझपदक जिंकण्यात त्यांना यश लाभले. भारतीयांनी ॲथलेटिक्समध्ये चार रौप्यपदक जिंकताना आपले वर्चस्व राखले. तसेच गोल्फ, नेमबाजी व बॅडमिंटन या खेळांमध्ये प्रत्येकी एक रौप्यपदक पटकावले. ॲथलेटिक्समध्ये तीन ब्राँझपदके जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंनी नेमबाजी व बॉक्सिंग या खेळांमध्ये प्रत्येकी एक ब्राँझपदक पटकावले. अदिती अशोकचे गोल्फमधील रौप्यपदक ऐतिहासिक ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.