India Women vs Australia Women 5th T20I : ऑस्ट्रेलियाने भारताचा पाचव्या टी 20 सामन्यात 54 धावांनी पराभव करत मालिका 4 - 1 अशी खिशात घातली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 196 धावांपर्यंत मजल मारली होती. त्याच्या प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण डाव 142 धावात संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून अॅश्लेघ गार्डनेरने नाबाद 66 तर ग्रेस हॅरिसने नाबाद 64 धावा चोपल्या. भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक 53 धावा केल्या.
मालिकेतील पाचवा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या इराद्याने भारत आज मैदानात उतरला होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेत कांगारूंची अवस्था 2 बाद 17 धावा अशी केली होती. मात्र तालिहा मॅग्राथ आणि एलिस पेरीने डाव सावरत ऑस्ट्रेलियाला 7 व्या षटकात 55 धावांपर्यंत पोहचवले.
ही जमलेली जोडी शफाली वर्माने मॅग्राथला 26 धावांवर बाद करत फोडली. त्यानंतर देविका वैद्यने पेरीला 18 धावांवर बाद करत दुसरी सेट बॅटर देखील बाद केली. मात्र यानंतर गार्डनेर आणि ग्रेस हॅरिसने भारताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करण्यास सुरूवात केली.
या दोघींनी शेवटच्या 5 षटकात तब्बल 67 धावा चोपल्या. गार्डनेरने 32 चेंडूत नाबाद 66 धावा ठोकल्या. तर ग्रेस हॅरिसने 35 चेंडूत नबाद 64 धावा करत ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 4 बाद 196 धावांपर्यंत पोहचवले. या दोघींनी पाचव्य विकेटसाठी 129 धावांची नाबाद भागीदारी रचली.
ऑस्ट्रेलियाच्या 196 धावांच्या प्रत्युत्तरात खेळताना भारताला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. स्मृती मानधना 4 धावा करून बाद झाली. यानंतर शफली वर्मा आणि हरलीन देओल यांनी भारताला आक्रमक सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र शफाली वर्मा 13 धावा करून बाद झाली. यानंतर आक्रमक खेळणारी हरलीन देखील 24 धावा करून माघारी फरली.
कर्णधार हरमनप्रीत कौरने देखील निराशा केली. अवघ्या 12 धावा करून ती देखील बाद झाली. कौरपाठोपाठ रिचा घोष देखील 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. रिचा बाद झाली त्यावेळी भारताच्या 5 बाद 70 धावा अशी अवस्था झाली होती.
मात्र भारताची अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्माने एकाकी झुंज देत 34 चेंडूत 53 धावांची खेळी केली. मात्र तिला साथ देणाऱ्या इतर बॅटरना फारशी चमक दाखवता आली नाही. अखेर सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर दिप्ती बाद झाली आणि भारत 142 धावात ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीत नाबाद 66 धावा करणाऱ्या अॅश्लेघ गार्डनेरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.