Bee invasion in Indian Wells: इंडियन वेल्स 2024 स्पर्धा सध्या चालू असून गुरुवारी (14 मार्च) एका सामन्यादरम्यान एक दुर्मिळ घटना घडली. या स्पर्धेत पहिल्या स्टेडियमवर कार्लोस अल्कारेज आणि ऍलेक्झँडर झ्वेरेव यांच्यात होत असेलल्या सामन्यादरम्यान अचानक मधमाशांनी हल्ला चढवला.
झाले असे की गतविजेता अल्कारेज आणि 6 व्या मानांकित झ्वेरेव यांच्यात गुरुवारी उपांत्यपूर्व सामना सुरु असतानाच अचानक मधमाशा स्टेडियममध्ये आल्या. त्यांनी संपूर्ण स्टेडियम भरले. त्यामुळे पंच मोहम्मद लहयानी यांना सामना स्थगित करावा लागला.
मधमाशांचा अचानक झालेला हा हल्ला बघून त्यांनी घाईत हा सामना स्थगित केल्याची घोषणा केली. मधमाशा स्टेडियममधील स्पायडर कॅमवर एकत्र येऊन बसल्या होत्या. यावर उपाययोजना करण्यासाठी बीकिपरची मदत घेण्यात आली.
या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अल्कारेज आणि झ्वेरेव यांच्यातील सामना 1 तास आणि 29 मिनिटे थांबला होता. त्यांनतर हा सामना अखेर पुन्हा सुरू झाला. दरम्यान, या घटनेचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या सामन्यात 20 वर्षीय अल्कारेजने झ्वेरेव विरुद्ध 6-3,6-1 असा दोन सेटमध्ये सहज विजय मिळवत उपांत्य सामन्यात प्रवेश केला.
सामन्यानंतर या घटनेनंतर अल्कारेज म्हणाला, 'हे विचित्र होते. मी असे कधीही टेनिस कोर्टवर पाहिलेले नाही. जेव्हा आम्ही कोर्टमधून बाहेर पळालो, तेव्हा टीव्हीवर मधमाशांचा हल्ला पाहिला आणि त्यावर खूप हसलो. ही घटना माझ्यासाठी तरी गमतीशीरच होती. हा सामना टेनिसपेक्षा या घटनेमुळे नेहमीच लक्षात राहिल.'
अल्कारेज म्हणाला, 'मी आकाशाकडे पाहिले, तेव्हा हजारो मधमशा दिसत होत्या. त्या माझ्याकडे येऊन केसांमध्ये घुसत होत्या. ते खूच विचित्र होते.'
पुन्हा सामना चालू झाल्याबद्दल तो म्हणाला, 'आम्ही पुन्हा वॉर्मअप केला आणि आणखी मधमाशा नाहीत ना, याची खात्री करून घेतली. त्यामुळे मी त्याबद्दल फार विचार न करता खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला.'
उपांत्य सामन्यात आता त्याचा सामना इटलीच्या 22 वर्षीय यानिक सिन्नर विरुद्ध होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.