French Open Tennis Grand Slam : अव्वल मानांकित स्पेनचा युवा खेळाडू कार्लोस अल्काराझ याने फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने मंगळवारी मध्यरात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत स्टेफानोस त्सित्सिपास याच्यावर सरळ तीन सेटमध्ये मात करीत पहिल्यांदाच फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली. अल्काराझसमोर आता अंतिम चार फेरीच्या लढतीत नोवाक जोकोविचचे आव्हान असणार आहे.
ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपास याला अद्याप एकाही ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवता आलेली नाही. फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याला त्याच्या प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही. अल्काराझने टेनिस कोर्टवर अप्रतिम खेळ केला. त्याने पहिला सेट ६-२ असा जिंकत आघाडी घेतली.
दुसऱ्या सेटमध्येही त्सित्सिपास याला झोकात पुनरागमन करता आले नाही. अल्काराझ याने दुसरा सेट ६-१ असा जिंकत विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली. तिसऱ्या सेटमध्ये त्सित्सिपासकडून कडवी झुंज देण्यात आली. ६-६ बरोबरी झाल्यानंतर या सेटमधील विजयासाठी टायब्रेकवर अवलंबून रहावे लागले. यामध्येही दोन्ही खेळाडूंमध्ये रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. पण अल्काराझ याने दबावाखाली खेळ उंचावला आणि ७-६ असा हा सेट जिंकला.
युवा वि. अनुभव
कार्लोस अल्काराझ व नोवाक जोकोविच यांच्यामध्ये पुरुष एकेरीची उपांत्य फेरीची लढत रंगणार आहे. या लढतीकडे तमाम टेनिसप्रेमींच्या नजरा असणार आहेत. २० वर्षीय अल्काराझ याने गेल्या वर्षी अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम जिंकले होते.
हे त्याचे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद होय. आता त्याला दुसऱ्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची आस लागली आहे. ३६ वर्षीय जोकोविच याला २३व्या विक्रमी ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घालावयाची आहे. हेच ध्येय त्याने डोळ्यांसमोर ठेवले असेल. त्यामुळे युवा वि. अनुभव अशा पद्धतीने होणाऱ्या या लढतीत कोण बाजी मारतोय, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
फ्रेंच ओपन स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाल्यापासून नोवाक जोकोविच व कार्लोस अल्काराझ यांच्यामध्ये होणाऱ्या उपांत्य फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मलाही हा सामना खेळण्याची आतुरता लागून राहिली आहे. जोकोविचचा ग्रँडस्लॅममधील हा ४५वा उपांत्य सामना असेल. माझा ग्रँडस्लममधील दुसराच उपांत्य सामना आहे. त्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे; पण मी त्याकडे फारसे लक्ष देत नाही.
कार्लोस अल्काराझ, टेनिसपटू, स्पेन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.