बर्मिंगहॅम : नीरज चोप्राच्या माघारीमुळे राष्ट्रकुलमध्ये भारताचे एक निश्चित पदक हुकले असले तरी किमान सहा पदके मिळण्याची आशा आहे. ॲथलेटिक्स ट्रॅकवरील स्पर्धा शर्यती आजपासून सुरू होत आहेत. नीरज चोप्राच्या अनुपस्थितीमुळे आता लांब उडीतील मुरली श्रीशंकर, स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे, थाळीफेकीत सीमा पुनिया आणि महिला भालाफेकीत अनु राणी यांच्याकडून पदकांच्या आशा आहेत. तिहेरी उडीत प्रवीण चित्रावेलस अब्दुल्ला अबोबेकर आणि एल्दोस पॉल यांच्याकडून किमान एक तरी पदक भारताला मिळू शकेल. राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणाऱ्या स्पर्धकांत हे खेळाडू सध्या चांगल्या तयारीचे समजले जात आहेत.
२०१० मध्ये नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने अॅथलेटिक्समध्ये दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि सात ब्राँझपदकांची कमाई केली होती. या कामगिरीची पुनरावृत्ती करणे सोपे नसेल. २०१४ आणि २०१८ मधील स्पर्धेत भारतीयांना अॅथलेटिक्समध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक ब्राँझपदकच मिळाले होते. उद्या भारतीयांची सुरुवात लांब उडीतील पात्रता फेरीने होईल. त्यात श्रीशंकर आणि महम्मद अनीस सहभागी होत आहेत. राष्ट्रीय विक्रमवीर श्रीशंकर चांगल्या फॉर्मात आहे. यंदाच्या मोसमात त्याने काही शर्यतीत ८ मीटरपेक्षा अधिक लांब उडी मारली आहे; मात्र राष्ट्रकुल स्पर्धेअगोदर झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत श्रीशंकरला ७.९६ मीटर एवढीच उडी मारता आली होती. ८.३६ मी. ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. या कामगिरीशी बरोबरी केली तरी त्याला किमान ब्राँझपदक मिळू शकेल.
उद्या सीमा पुनिया आणि नवज्योत कौर धिल्लॉन यांच्या थेट पदकांच्या स्पर्धा आहेत. गत स्पर्धेत या दोघींनी रौप्य आणि ब्राँझपदक जिंकले होते. सीमाने आतापर्यंत तीन रौप्य आणि एक ब्राँझपदक मिळवलेले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतून ती कधीही रिकाम्या हाती परतलेली नाही, त्यामुळे उद्या तिच्याकडून पदकाच्या सर्वाधिक अपेक्षा आहेत. मिल्खासिंग यांनी १९५८ मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत अॅथलेटिक्समध्ये पाच सुवर्ण, १० रौप्य आणि १३ ब्राँझपदकांसह एकूण २८ पदकांची कमाई केलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.