वेलिंग्टन : नुकत्याच ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी-२० विश्वकरंडकात उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन संघांमध्ये उद्यापासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला वेलिंग्टनमध्ये सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडीजमध्ये होणार असलेल्या पुढील टी-२० विश्वकरंडकाची तयारी या लढतीपासूनच सुरू होणार आहे. भारताचा नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाचा या वेळी कस लागणार आहे.
भारताकडून इशान किशन व शुभमन गिल हे फलंदाज सलामीला येतील; मात्र तिसऱ्या स्थानावर कोणत्या फलंदाजाला पाठवायचे याबाबत संभ्रम कायम आहे. संजू सॅमसन, श्रेयस अय्यर व दीपक हूडा यांच्यामध्ये हे स्थान पटकावण्यासाठी चुरस असणार आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव, रिषभ पंत व हार्दिक पंड्या अशी फलंदाजी क्रमवारी असणार आहे.
टी-२० विश्वकरंडकात बाकावर बसलेला फिरकीपटू युझवेंद्र चहल याला संधी मिळेल. त्याच्यासोबत वॉशिंग्टन सुंदर हा ऑफस्पिनर संघात असण्याची शक्यता आहे. कारण तो गोलंदाजीसोबत फलंदाजीही करतो. त्यामुळे कुलदीप यादवला संघाबाहेरच बसावे लागू शकते. भुवनेश्वरकुमार व अर्शदीप सिंग हे वेगवान गोलंदाज संघात असतील. तिसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी हर्षल पटेल व उमरान मलिक यांच्यामध्ये रस्सीखेच असेल.
या खेळपट्टीत दडलंय काय?
न्यूझीलंडमधील बहुतांशी शहरांमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडतो, पण वेलिंग्टन येथे परिस्थिती थोडी भिन्न आहे. येथे प्रथम फलंदाजी करणारा संघ सरासरी १६२ धावा करतो. तसेच गेल्या २० महिन्यांमध्ये येथे एकही टी-२० लढत खेळवण्यात आलेली नाही. वेलिंग्टनमध्ये उद्या दिवसभरात पावसाची शक्यता आहे; मात्र दोन देशांमधील लढत ही न्यूझीलंडमधील वेळेनुसार रात्री ७.३० वाजता होणार आहे. तोपर्यंत पाऊस गेलेला असेल.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
भारताने न्यूझीलंडमध्ये झालेल्या मागील टी-२० मालिकेत यजमान संघाला ५-० अशी धूळ चारली होती. न्यूझीलंडमध्ये द्विपक्षीय मालिकेत निर्भेळ यश संपादन करणारा भारत एकमेव संघ ठरला आहे.
टी-२० विश्वकरंडकात खेळलेल्या भारताच्या १५ पैकी फक्त आठ खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळत आहेत.
पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान याच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये या वर्षात सर्वाधिक १३२६ धावा करण्याचा विक्रम आहे. भारताच्या सूर्यकुमार यादवला हा विक्रम मोडीत काढण्यासाठी आणखी २८६ धावांची गरज आहे.
संभाव्य संघ : भारत : ईशान किशन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर/संजू सॅमसन/दीपक हूडा, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल/उमरान मलिक, भुवनेश्वरकुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
न्यूझीलंड : फिन ॲलेन, डेव्होन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलीप्स, डॅरेल मिचेल, जेम्स निशाम, मिचेल सँटनर, टीम साऊथी, इश सोधी, ॲडम मिल्न, लॉकी फर्ग्युसन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.