Maharashtra Legislative Assembly: भारतीय क्रिकेट संघाने २९ जून रोजी टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं. यानंतर भारतीय संघाचं जोरदार कौतुक होत आहे. हे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी (४ जुलै) मायदेशी परतला.
मायदेशी परतल्यानंतर गुरुवारी दिल्ली आणि मुंबई येथे भारतीय संघाचा मोठा गौरव करण्यात आला. यानंतर आता शुक्रवारी महाराष्ट्र शासनाकडून टी२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात असलेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल या मुंबईच्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. याबरोबरच भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू पारस म्हाम्ब्रे आणि मसाज थेरपिस्ट अरुण कानडे यांचाही गौरव करण्यात आला.
भारतीय संघातील महाराष्ट्राचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य यांचा आधी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर हे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य विधानसभेसाठी रवाना झाले. महाराष्ट्र शासनाकडून चारही खेळाडूंना प्रत्येकी १ कोटीचे बक्षीसही देण्यात आले आहे.
विधान भवनातही या खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांचे स्वागत मराठमोळ्या पद्धतीने झाले. यावेळी ढोल-ताशा आणि लेझीमचा गजर करण्यात आला. यानंतर जेव्हा विधान सभेत या खेळाडूंचे आगमन झाले, त्यावेळी संपूर्ण विधानसभेत रोहितच्या नावाचा जयघोष करण्यात आला.
यावेळी 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' अशा घोषणाही देण्यात आल्या. विशेष म्हणजे यावेळी सर्व नेते आपापसातील भांडण विसरून खेळाडूंना समर्थन देताना दिसला.
यावेळी विधान सभेत रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मराठीत भाषण करत सर्वांची मनंही जिंकली. यादरम्यान, रोहितने गमतीने असंही म्हटलं की 'वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात जर सूर्यकुमारने डेव्हिड मिलरचा झेल घेतला नसता, तर मी त्याच्याकडे पाहिलं असतं.'
टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १७७ धावांच्या आव्हाना पाठलाग दक्षिण आफ्रिका करत असताना शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती.
त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड मिलरचा महत्त्वाचा झेल हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने बाऊंड्री लाईनजवळ घेतला होता. यानंतर दक्षिण आफ्रिका संघ २० षटकात ८ बाद १६९ धावाच करता आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.