आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 28 व्या सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने विराट सेनेला 8 विकेट्सनी नमवत स्पर्धेतील आपले आव्हान भक्कम केले. या पराभवामुळे टीम इंडियाचे स्पर्धेतील भविष्य अधांतरी झाले आहे. एखादा चमत्कारच आता टीम इंडियाला स्पर्धेत टिकवून ठेवू शकतो.
भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना ठराविक अंतराने विकेट गमावल्या. परिणामी टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 7 बाद 110 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या संघाने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 14.3 षटकात विजयी नोंदवला. या पराभवाने विराट कोहलीसह टीम इंडियाच्या ताफ्यात निराशा दिसून आली. सामन्यानंतर विराट कोहलीने संघाने केलेल्या चुका महागात पडल्याचे प्रामाणिकपणे कबुल केले. फलंदाजी आणि गोलंदाजी कोणत्याच क्षेत्रात आम्ही नावाला साजेसा खेळ करु शकलो नाही, असे तो म्हणाला.
सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कोहली म्हणाला की, बॅटिंग किंवा बॉलिंगमध्ये आम्ही धैर्याने खेळू शकलो नाही. मैदानात उतरल्यापासूनच आमची देहबोली (Body Language) नकारात्मक होती. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ सकारात्मकतेनं खेळला. जेव्हा आम्ही फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा आम्ही विकेट गमावली. ज्यावेळी फटका मारावा की नाही असा संभ्रम असतो त्यावेळी अशी वेळ पाहायला मिळते. आमच्या बाबतीत तोच प्रकार घडला. जेव्हा तुम्ही भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करता त्यावेळी तुमच्यावर अपेक्षांचे ओझे असते. पण आम्ही ते पेलण्यात कमी पडलो.
तो पुढे म्हणाला, आमचा खेळ पाहण्यासाठी लोक स्टेडियममधेय येतात. पण आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही. दोन्ही सामन्यात एकच चूक आम्हाला महागात पडली. सकारात्मकतेनं आणि योग्य विचार करुन खेळायला हवे होते. अधिक दबावात खेळून आम्ही अडचणी वाढवल्या. सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग खडतर असला तरी स्पर्धेत अजून खूप सामने बाकी आहेत. या चुका सुधारून सकारात्मक खेळ दाखवू, असा विश्वासही कोहलीने व्यक्त केला.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या विरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडिया अडचणीत आली आहे. उर्वरित सामन्यात त्यांना स्कॉटलंड, अफगाणिस्तान आणि नामिबिया या संघाविरुद्ध खेळायचे आहे. उर्वरित सर्व सामने मोठ्या अंतराने जिंकून टीम इंडियाला आता जर तर च्या समीकरणावर अवलंबून रहावे लागणार आहे. सुपर 12 मधील भारताच्या गटात जे सहा संघ आहेत त्यातील पाकिस्तान संघाने तीन पैकी तीन सामन्यातील विजयासह सेमीफायनलचे तिकीट पक्के केले आहे. दुसऱ्या जागेसाठी अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड सध्या शर्यतीत आहेत. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर टीम इंडियाचे स्पर्धेतील भविष्य ठरणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.