T. Dilip Team India Fielding Coach : भारतीय संघातील जवळपास सर्वच क्रिकेटपटू करोडपती आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा आयपीएल या खेळाडूंना बॅटिंग बॉलिंग चांगली केली की सामन्याचा मानकरी किंवा मालिकेचा मानकरी म्हणून बक्षीस देण्यात येतं. हे बक्षीस बहुतेकवेळा पैशाच्या स्वरूपातच असतं. तो भलामोठा चेक त्यांच्या हातात सोपवला जातो अन् त्यावरील रक्कम नक्कीच लाखात असते.
आयपीएलचा लिलाव, बीसीसीआयचा करार, जाहिराती, सोशल मीडियाची पोस्ट नुसता पैसा! या पैशात लोळणाऱ्या भारतीय खेळाडूंना एका गणिताचे क्लासेस घेणाऱ्या व्यक्तीनं फक्त एक मेडल देऊन भरपूर मोठं काम काढून घेतलं. यंदाच्या टी 20 वर्ल्डकपच्या फायलनमध्ये या मेडलची कमाल आपल्याला दिसली. भारताच्या चोकर्स पासून वर्ल्ड चॅम्पियन होण्यात या मेडलनेच महत्वाची भुमिका बजावली.
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. समोर डेव्हिड मिलर सारखा किलर व्यक्ती उभा होती. दोन चांगल्या हिट अन् भारताचा खेळ खल्लास! किलर मिलरनं हार्दिक पांड्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफला चेंडू जवळपास सीमारेषेच्या बाहेर गेलाच होता. समालोचकही सिक्स असं उच्चारणार होता. तेवढ्यात सूर्यकुमार चित्याच्या चपळाईने आला अन् सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू आत खेचून त्याचं कॅचमध्ये रूपांतर केलं.
तिकडं ड्रेसिंग रूममध्ये टी दिलीप यांनी त्यांच्या डायरीच टिक मार्क केलं. हे तेच टी दिलीप आहेत ज्यांनी भारतीय संघात फिल्डिंगच वेगळं कल्चर आणलं अन् फिल्डिंगला बॅटिंग बॉलिंग इतकंच महत्व मिळवून दिलं. टी दिलीप यांनी प्रत्येक सामन्यातला उत्कृष्ट फिल्डर निवडून त्याला मेडल देण्याची प्रथा सुरू केली. यामुळं खेळाडूंना जीव तोडून फिल्डिंग करण्यासाठी एक कारण मिळालं.
हे मेडल देताना टी दिलीप हे आज कोणी कोणी चांगली फिल्डिंग केली हे सांगत होते. त्यामुळे जरी मेडल मिळालं नाही तरी कौतुकाची थाप पाठीवर पडल्यानं टीम इंडिया मैदानावर झोकून देऊन फिल्डिंग करू लागली. टी दिलीप यांनी क्रिकेट जगतातील दिग्गज माजी खेळाडूंकडून हे मेडल खेळाडूंना दिलं. त्याचा वेगळाच प्रभाव खेळाडूवर पडतो. जे खेळाडू कोट्यावधी रूपयात खेळतात. त्यांना हे अवघ्या काही शेकड्यात मिळणारे मेडल अनमोल वाटू लागलं. हे मेडल किती मोठं काम करून गेलं हे टी 20 वर्ल्डकप 2024 च्या फायनलनंतर सर्वांच्या लक्षात आलं असेल.
टी दिलीप बद्दल सांगायचं झालं तर त्याच्या क्रिकेट खेळण्याला त्याच्या घरच्यांनी विरोध केला. मात्र टी दिलीपनं जिद्द सोडली नाही. त्यानं शाळकरी मुलांचे गणिताचे क्लासेस घेतले. त्या पैशातून आपल्या कोचिंगची फी भागवली. टी दिलीप यांनी राज्याचे संघ, विभागाचे संघ इथून आपली कोचिंग जर्नी सुरू केली होती. त्यांनी एनसीएमध्ये आर. श्रीधर यांच्याबरोबर बरंच काम केलं.
या कष्टाळू मुलावर राहुल द्रविडची नजर पडली. एनसीएचा डायरेक्टर असताना राहुल द्रविडनं टी दिलीप यांना इंडिया ए च्या संघासोबत सातत्यानं ठेवलं. नंतर आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्ससोबत त्यानं काम केलं. एनसीएमध्ये शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा यांच्यावर त्यानं मोठ्या मेहनतीनं काम केलं. त्याचं फळ आता मिळत आहे.
टी दिलीप यांनी आपल्या कम्युनिकेशन स्किलवर देखील भर दिला. तो ज्या प्रकारे चांगल्या फिल्डरचे कौतुक करतो ते पाहण्यासारखं असतं. असे हे तळातून काम करून वरच्या स्थानापर्यंत पोहचलेले टी दिलीप देखील या टी 20 वर्ल्डकप विजयाचे खेळाडूंइतकेच मोठे शिलेदार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.