Rashid Khan Record: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशला अवघ्या 8 धावांनी पराभूत केले आणि उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका निभावली. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने 4 विकेट्स घेत मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली.
राशिदने या सामन्यात सौम्य सरकार, तोहिद हृदय, महमुद्दुलाह आणि रिषाद हुसैन यांना बाद केले. त्याने 4 षटकात 23 धावा देत या 4 विकेट्स घेतल्या.
राशिदने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही नववी वेळ होती. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा एकाच सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने बांगलादेशच्या शाकिब अल हसनचा विक्रम मोडला आहे. शाकिबने असा करनामा 8 वेळा केला आहे.
9 वेळा - राशिद खान (92 सामने, अफगाणिस्तान)
8 वेळा - शाकिब अल हसन (129 सामने, बांगलादेश)
7 वेळा - हेन्री सेन्योन्डो (78 सामने, युगांडा)
6 वेळा - ध्रुवकुमार मैसुरीया (37 सामने, बोत्सवाना)
6 वेळा - नलीन निपीको (33 सामने, वनुआतू)
6 वेळा - उमर गुल (60 सामने, पाकिस्तान)
सामन्याबद्दल सांगायचे झाले तर अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 115 धावाच करता आल्या होत्या. अफगाणिस्तानकडून रेहमनुल्लाह गुरबाजने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तसेच राशिदने 18 नाबाद धावा केल्या.
बांगलादेशकडून रिषाद हुसैनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच तस्किन अहमद आणि मुस्तफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर पावसामुळे बांगलादेशसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 19 षटकात 114 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघ 17.5 षटकात 105 धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशकडून लिटन दासने नाबाद 54 धावा करत एकाकी झुंज दिली, मात्र त्याला बाकी कोणाची साथ मिळाली नाही.
अफगाणिस्तानकडून राशिदव्यतिरिक्त नवीन-उल-हकनेही 4 विकेट्स घेतल्या. तसेच फझलहक फारुकी आणि गुलबदिन नायब यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.