David Wiese: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचे रणशिंग रविवारी फुंकले गेले. त्यानंतर आता या स्पर्धेतील तिसऱ्याच सामन्यात रोमांच पाहायला मिळाला. सोमवारी झालेल्या ओमान आणि नामिबिया सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने 11 धावांनी बाजी मारली. नामिबियासाठी डेविड विज विजयाचा हिरो ठरला.
या सामन्यात ओमानच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकात 109 धावाच करता आल्या. त्यानंतर 110 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबायालाही मोठा संघर्ष करावा लागला. त्यांनाही 20 षटकात 6 बाद 109 धावाच करता आल्या. त्यामुळे सामन्यात बरोबरी झाली आणि सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने प्रथम फलंदाजी केली. त्यांच्याकडून विज आणि कर्णधार गेरहार्ड इरॅस्मस फलंदाजीला उतरले, तर ओमानकडून बिलाल खान गोलंदाजीला उतरला. यावेळी विजने पहिल्याच चेंडूत चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर लाँग-ऑनला षटकार मारला.
त्यानंतर पुढच्या चेंडूवर दोन धावा आणि चौथ्या चेंडूवर एकेरी धाव काढली. त्यामुळे पहिल्या चार चेंडूत 13 धावा निघाल्या. अखेरच्य दोन चेंडूत इरॅस्मसने दोन चौकारासह 8 धावा काढल्या. त्यामुळे नामिबियाने सुपर ओव्हरमध्ये बिनबाद 21 धावा केल्या.
त्यानंतर नामिबियाने सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजीची संधीही विजलाच दिली. त्याने 22 धावांचा बचाव करताना सुपर ओव्हरमध्ये अवघ्या 10 धावाच ओमानला दिल्या. विशेष म्हणजे पहिल्या तीन चेंडूत ओमानकडून नसीम खुशीला 2 धावाच करता आल्या, तो तिसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीतही झाला.
चौथ्या चेंडूवर आकिब इलियासने ओमानसाठी एकच धाव काढली. तर पाचव्या चेंडूवर झीशन मकसूदनेही एकच धाव काढली. त्यामुळे पहिल्या पाच चेंडूत केवळ चारच धावा ओमानला काढता आल्या. त्यामुळे नामिबियाचा विजय निश्चित झाला होता. अखेरच्या चेंडूवर अकिबने षटकार ठोकत ओमानला 10 धावांपर्यंत पोहचवलं.
दरम्यान सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्हीमध्ये कमाल करणारा डेव्हिड विज सामनावीर ठरला.
तत्पुर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओमानकडून खलीद कैलने 34 धावांची खेळी केली, तर झीशन मकसूदने 22 धावांची खेळी केली. पण या दोघांव्यतिरिक्त कोणालाही खास काही करता आले नाही.
नामिबियाकडून रुबेन ट्रम्पलमनने 4 विकेट्स घेतल्या, तर विजने 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय इरॅस्मसनेही 2 विकेट्स घेतल्या आणि बेनार्ड शोल्ट्झने 1 विकेट घेतली.
त्यानंतर 110 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाकडून जॅन फ्रायलिंक 45 धावांची खेळी केली. तसेच निकोलस डाविनने 24 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात नामिबियाला विजयासाठी 5 धावांचीच गरज होती. मात्र, ओमानच्या मेहरन खानने केवळ 4 धावाच देत सामना बरोबरीत राखला.
ओमानकडून मेहरन खानने 3 विकेट्स घेतल्या, तसेच बिलाल खान, अकिब आणि आयन खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.