Pakistan Team T20 World Cup 2024 : आठ महिन्यांपूर्वी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेनंतर आता ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत साखळीतच गाशा गुंडाळावा लागलेल्या पाकिस्तानी खेळाडूंची त्यांच्या क्रिकेट मंडळाकडून झाडाझडती होणार आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात कपात करण्याचे संकेत पाक मंडळाने दिले आहेत.
अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि अमेरिकेने सुपर आठ फेरी गाठली. त्याचवेळी पाकिस्तानी संघाचे आव्हान संपुष्टात आले. पावसामुळे त्यांची संधी हुकली असली तरी स्पर्धेत अगोदर अमेरिका आणि नंतर भारताकडून झालेल्या पराभवामुळे त्यांचा पाय खोलात गेला होता.
जवळपास सर्वच खेळाडूंकडून झालेल्या सुमार खेळामुळे त्यांच्या सर्वच माजी खेळाडूंनी टीकेचे आसूड ओढलेले आहेत. आता तर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने खेळाडूंच्या नाड्या आवळण्याचे संकेत दिले आहेत.
पाक मंडळाचे अगोदरचे अध्यक्ष झाका अश्रफ यांच्या कार्यकाळात खेळाडूंबरोबर करण्यात आलेले करार रद्द करावे, असा सल्ला काही पदाधिकाऱ्यांनी विद्यमान अध्यक्ष मोहसिन नकवी यांना दिला आहे. मुळात सर्व करारांचा फेरआढावा घेण्यात येणार आहेत आणि तसे झाल्यास खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनात कपात होऊ शकेल. मोहसिन नकवी हेसुद्धा खेळाडूंवर कारवाई करण्याच्या मनःस्थितीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेअगोदरच्या आशिया करंडक स्पर्धेतही पाकचा संघ पाचव्या स्थानावर आला होता. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही; परंतु कडक उपाययोजनांवर आम्ही अध्यक्षांशी चर्चा करणार आहोत, असे मंडळातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
झाली होती पगारवाढ
गतवर्षी तत्कालीन अध्यक्ष झाका अश्रफ यांनी खेळाडूंच्या मानधनात मोठी वाढ केली होती. तसेच, पीसीबीला मिळणाऱ्या उत्पन्नातून खेळाडूंना ठराविक रक्कमही देण्याचाही करार झाला होता. आता यात कपात होणार हे जवळपास निश्चित आहे. ही विश्वकरंडक स्पर्धा जिंकली तर प्रत्येक खेळाडूला एक लाख डॉलरचे अतिरिक्त बक्षीस देण्याची घोषणा आत्ताचे अध्यक्ष नकवी यांनी केली होती.
पाक संघात गटबाजी
पाकिस्तान संघात गटबाजी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. कर्णधार बाबर आझम, शाहिन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांचे तीन गट असल्याचे दिसून येत आहेत.
भारतातील एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेनंतर बाबर आझमची कर्णधारपदावरून हकालपट्टी करून शाहिन आफ्रिदीला कर्णधार केले; पण आता या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी पुन्हा बाबर आझम कर्णधार झाला. या दोघांच्या स्पर्धेत आपल्याला कर्णधारपद मिळत नसल्याचे आरोप मोहम्मद रिझवान करत आहे. यातच गेल्या काही वर्षात संघातून दूर असलेल्या मोहम्मद आमीर आणि इमाद वसीम यांना पुन्हा संघात आणल्यामुळेही संघर्ष वाढला आहे.
मोहम्मद आमीरसारखा गोलंदाज अखेरच्या षटकांत अमेरिकेसारख्या संघाविरुद्ध १५ धावांचे संरक्षण करू शकत नाही. सुपर ओव्हरमध्येही तो फुलटॉस चेंडू टाकतो, अशी निराशा अध्यक्ष नकवी यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.