T20 World Cup 2024 Points Table Group A update : अमेरिकन संघाने पाकिस्तानचा रंगतदार सामन्यात पराभव केला आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेत धमाल उडाली. इतकेच नाही तर भारतीय संघाचा समावेश असलेल्या गटातील समीकरणे बदलून गेली. दोन सामन्यांतील दोन विजयाने अमेरिकन संघ गटात सध्या अव्वल स्थानी आहे.
आता अमेरिकन संघाने आयर्लंड समोरचा सामना जिंकला तर त्यांचा सुपर ८ स्पर्धेतील प्रवेश नक्की होणार आहे. अर्थातच एका पराभवाने पाकिस्तान संघाची हालत खराब झाली असून दडपणाचे ओझे शतपटीने वाढले आहे. आणि पाकिस्तानवर आता बाहेर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कॅनडा संघाचा पराभव करताना अमेरिकन संघाने दणकट खेळ केला होता. भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडियन वंशाचे खेळाडू अमेरिकन संघात असल्याने त्यांची क्रिकेट सामना खेळतानाची शैली चांगली दिसली होती. तरी पाकिस्तानसारख्या टी-२० विश्वचषक जिंकलेल्या संघाला अमेरिकन संघाकडून पराभवाचा धक्का बसेल, असे कधीच वाटले नव्हते.
माजी खेळाडू रमीझ राजा यांच्या मते, ना आमचे हक्काचे फलंदाज जोरदार चमकले ना आमच्या अनुभवी गोलंदाजांनी अचूक मारा केला. मोहंमद आमीर सारख्या जाणत्या गोलंदाजाला दडपणाखाली कचरताना बघून कमाल वाटली. टी-२० क्रिकेट प्रकार दिलखुलासपणे व्यक्त होण्याचा आहे. उलटपक्षी पाकिस्तानचा संघ सतत किती दडपणाखाली खेळत असतो त्याची प्रचिती गेला सामना बघताना आली, या शब्दांत रमीझ राजा यांनी निराशा व्यक्त केली.
एका सामन्यातील अनपेक्षित निकालाने गटातील समीकरणे एकदम बदलली आहेत. अमेरिकन संघाला आता एक सामना जिंकून सुपर ८ फेरीत पोहोचण्याची स्वप्न पडू लागली आहेत. दुसरीकडे पाकिस्तान संघासाठी रविवारचा भारतासमोरचा सामना अचानक जिंकू किंवा मरू असा झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.