T20 World Cup 2024 Super 8 : टी-२० विश्वकरंडकातील पुढल्या फेरीतील अर्थातच ‘सुपर आठ’ फेरीतील सात संघ निश्चित झाले आहेत. साखळी फेरी संपायला अद्याप दोन दिवस बाकी आहेत. पुढल्या फेरीतील आठवा संघ उद्या निश्चित होणार आहे. ड गटातून दक्षिण आफ्रिकन संघ आठ गुणांसह पुढल्या फेरीत पोहोचला आहे. या गटातील दुसरा संघ कोणता असेल, याचे उत्तर सोमवारी मिळेल. बांगलादेश - नेपाळ आणि नेदरलँड्स - श्रीलंका या ड गटातील लढतींच्या निकालांनंतर अखेरचा संघ पक्का होणार आहे.
बांगलादेशच्या संघाने नेपाळ संघाला पराभूत केल्यास त्यांचा प्रवेश निश्चित होणार आहे. अशा परिस्थितीत नेदरलँड्स संघाने श्रीलंकेला पराभूत केल्यानंतरही त्यांना पुढल्या फेरीत प्रवेश करता येणार नाही, पण जर नेपाळने बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत केल्यास त्यांच्यासाठी मार्ग खडतर ठरू शकणार आहे. कारण याप्रसंगी नेदरलँड्स संघाने श्रीलंकेला मोठ्या फरकाने नमवल्यास त्यांना ‘सुपर आठ’ फेरीमध्ये पोहोचता येणार आहे.
नेपाळ संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी चांगलेच झुंजवले होते. दक्षिण आफ्रिकन संघाने फक्त एका धावेनेच विजय मिळवला होता. त्यामुळे आता बांगलादेश संघाने नेपाळला कमी लेखून चालणार नाही. नेपाळ संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे, पण या स्पर्धेतील अखेरच्या लढतीत कसोटी खेळत असलेल्या देशाला पराभूत करण्यासाठी त्यांचा संघ प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशने नेपाळविरुद्धच्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक असणार आहे.
ड गटाची सध्याची परिस्थिती
१) दक्षिण आफ्रिका - चार सामने, चार विजय, आठ गुण, ०.४७० सरासरी
२) बांगलादेश - तीन सामने, दोन विजय, एक पराभव, चार गुण, ०.४७८ सरासरी
३) नेदरलँड्स - तीन सामने, एक विजय, दोन पराभव, दोन गुण, -०.४०८
४) नेपाळ - तीन सामने, दोन पराभव, एक गुण, -०.२९३
५) श्रीलंका - तीन सामने, दोन पराभव, एक गुण, -०.७७७
शेवट गोड करण्यासाठी...
न्यूझीलंडच्या संघाने मागील काही वर्षांमध्ये एकदिवसीय व टी-२० या दोन्ही प्रकारांच्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. यंदाच्या टी-२० विश्वकरंडकात मात्र त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. आता क गटामध्ये न्यूझीलंडचा संघ आज होत असलेल्या अखेरच्या सामन्यात पापुआ न्यू गिनी संघाशी दोन हात करणार आहे. या लढतीत विजय मिळवून शेवट गोड करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल. पापुआ न्यू गिनी संघाने तीनही लढतींत हार पत्करली. त्यामुळे त्यांनीही स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्याचा ध्यास बाळगला असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.