Ind vs Eng Test sakal
क्रिकेट

Ind vs Eng Test : बेन डकेटचा शतकी ‘दरोडा’ ; ८८ चेंडूंतच शतक, भारतीय गोलंदाजांविरुद्ध धावांची लूट

नाबाद १३३ धावा, त्यात २१ चौकार आणि २ षटकार, अशी आकडेवारी साधारणतः मर्यादित षटकांच्या प्रकारात असते; परंतु बेन डकेटने जणू काही भारतीय गोलंदाजांवर दरोडा टाकावा, अशी टोलेबाजी केली.

सकाळ वृत्तसेवा

राजकोट : नाबाद १३३ धावा, त्यात २१ चौकार आणि २ षटकार, अशी आकडेवारी साधारणतः मर्यादित षटकांच्या प्रकारात असते; परंतु बेन डकेटने जणू काही भारतीय गोलंदाजांवर दरोडा टाकावा, अशी टोलेबाजी केली. त्यामुळे इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या ४४५ धावांना २ बाद २०७ असे प्रत्युत्तर दिले.

बॅझबॉल तंत्राने फलंदाजी करण्याच्या पताका डकेटने आपल्या खांद्यावर घेतल्या आहेत. पहिल्या दोन कसोटीत त्याने असाच खेळ केला होता; परंतु आज शतकात त्याचे रूपांतर केले. ८८ चेंडूंत शतक आणि दिवसअखेर ११२ च्या स्ट्राईक रेटने नाबाद १३३ धावांची खेळी भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर टाकणारी ठरली; मात्र यात अश्विनने पाचशे कसोटी बळी मिळवण्याचा केलेला पराक्रम त्यातल्या त्यात समाधान देणारा ठरला.

पुन्हा एकदा स्विप-रिव्हर्स स्विपचा मुक्त वापर इंग्लिश फलंदाजांनी प्रामुख्याने डकेटने केला. त्याचा एक षटकार तर रिव्हर्स स्विपचा होता. इतकी हुकूमत त्याने या फटक्यांवर मिळवली आहे. भारतीय गोलंदाजांवर पहिल्या षटकापासून आक्रमण केल्यामुळे इंग्लंडचा धावफलक षटकामागे सहापेक्षा अधिक धावांच्या सरासरीने पळत होता. दिवसभरात केवळ दोन विकेट मिळवू शकलेल्या भारतीय गोलंदाजांसाठी ही चिंतेची बाब आहे.

पहिल्या दिवशीचे नाबाद फलंदाज लगेच बाद झाल्यावर भारताचा डाव लवकर संपवण्याचे मनसुबे उधळले गेले. कधी नव्हे ते भारताच्या तळातील फलंदाजांनी मन लावून फलंदाजी केल्याने इंग्लंड संघाला भारताचा डावा गुंडाळायला १३० षटके मारा करावा लागला. मार्क वुडने केलेल्या अथक माऱ्यामुळे ४४५ धावांवर भारताचा डाव संपल्यावर राजकोटच्या खेळपट्टीवर फलंदाजी करायचा आनंद इंग्लंडच्या फलंदाजांनी लुटायला सुरुवात केली. बेन डकेटने अत्यंत आक्रमक खेळ सादर करताना वेगवान शतकाची (नाबाद १३३) नोंद केली. मोठ्या धावसंख्येचे दडपण झुगारून देताना षटकामागे जवळपास ६ धावांची सरासरी राखत इंग्लंडने दुसर्‍या दिवशीचा खेळ संपताना २ बाद २०७ची तगडी धावसंख्या उभारली.

भारताचा डाव १३० षटके चालल्या-नंतरही राजकोटची खेळपट्टी फलंदाजालाच पोषक होती. बेन डकेटने जास्त काळ यष्टिरक्षण करायला लावल्याची नाराजी एका मागोमाग एक चौकार मारून व्यक्त केली. बुमरा- सिराजबरोबर डकेटने कुलदीप यादवलाही धारेवर धरले. फक्त ३९ चेंडूत अर्धशतक ठोकताना बेन डकेटने कडाकड ११ चौकार मारले. समोरून झॅक क्रॉली जरा संयमाने खेळत होता. बेन डकेटचा धडाका बघून क्रॉलीला मोठा फटका मारावासा वाटला आणि तोच अश्विनचा ५००वा कसोटी बळी झाला. पहिला फलंदाज ८४ धावांवर बाद झाला, ज्यात क्रॉलीचा वाटा फक्त १५ धावांचा होता.

धावफलक

भारत पहिला डाव ः १३०.५ षटकांत सर्वबाद ४४५ (सरासरी ३.४०) (रोहित शर्मा १३१, रवींद्र जडेजा ११२, सर्फराझ खान ६२, ध्रुव जुरेल ४६, रवीचंद्रन अश्विन ३७, जसप्रीत बुमरा २६, मार्क वूड २७.५-२-११४-४, ज्यो रूट १६-३-७०-१, रेहान अहमद २२-२-८५-२)

इंग्लंड, पहिला डाव ः ३५ षटकांत २ बाद २०७ (सरासरी ५.९१) (झॅक क्रॉली १५, बेन डकेट खेळत आहे १३३ - ११८ चेंडू, २१ चौकार, २ षटकार, ऑली पोप ३९, मोहम्मद सिराज १०-१-५४-१, अश्विन ७-०-३७-१)

जडेजा, कुलदीप लवकर बाद

दुसऱ्या दिवशीच्या खेळाची सुरुवात इंग्लंड संघासाठी आश्वासक झाली. कुलदीप यादव आणि शतकवीर जडेजा लवकर बाद झाले. पदार्पण करणाऱ्या ध्रुव जुरेलने अनुभवी अश्विनला चांगली साथ दिली. दोघांनी मार्क वूड- अँडरसन जोडीचा मारा समर्थपणे पेलला. बेन स्टोक्सने मार्क वूडला सतत आखूड टप्प्याचा मारा करायला लावताना ६ क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला लावले होते. खेळपट्टी अजूनही गोलंदाजांना जास्त साथ देत नसल्याने दोघा फलंदाजांनी नजर बसल्यावर चांगले फटके मारून धावा जमा केल्या. खास करून फिरकी गोलंदाजांना दोघांनी सहजी तोंड दिले. चांगल्या गोलंदाजांना संयम राखून फलंदाज करणाऱ्या अश्विन - जुरेलची एकाग्रता रेहान अहमद गोलंदाजी आल्यावर भंग पावली. त्यामानाने साध्या चेंडूंवर दोघांनी रेहानला फटका मारताना विकेट गमावली. दोघांदरम्यान झालेली ७७ धावांची भागीदारी भारतीय संघाला ४०० धावांपार घेऊन गेली होती.

बुमरा-सिराजची भागीदारी

अनपेक्षितपणे शेवटच्या विकेटसाठी बुमरा - सिराजने ३० धावा जोडल्या. बुमराने झटपट २६ धावा करताना ३ चौकार आणि एक षटकार मारला. चौथा बळी घेणाऱ्या मार्क वुडने बुमराला पायचित करून भारताचा डाव ४४५ धावांवर संपवला.

आथरटनला आवडली भेंडीची भाजी

राजकोट सामन्यासाठी सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने पत्रकारांची उत्तम सोय केली आहे. गुगली एकच आहे तो म्हणजे जेवण फक्त शाकाहारी आहे. सामन्याचे वार्तांकन करायला आलेल्या जवळपास १५ ब्रिटिश पत्रकारांना रोज काही ना काही मांसाहाराची सवय असताना फक्त शाकाहारी जेवण कसे वाटते, असे विचारता इंग्लंडचा माजी कप्तान महान फलंदाज मायकेल आथरटन म्हणाला, ‘‘जर भेंडीची भाजी इतकी चवदार असेल आणि त्यासोबत कढी-पकोडी मिळते आहे तर कोणाला मांसाहाराची उणीव जाणवणार नाही. शाकाहारी पदार्थांमध्ये इतकी विविधता बघून आम्हाला कमाल वाटतेय. फक्त राजकोटला येऊन काहीसे तिखट काठीयावाडी जेवण करायची अजून हिंमत कोणाला झालेली नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

Paranda Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी आणण्यासाठी धमक लागते - प्रा. डॉ. तानाजी सावंत

Parli Assembly constituency 2024 : परळी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच: ना सभा,ना रँली गाठीभेटीने संपला परळी विधानसभेचा प्रचार

SCROLL FOR NEXT