Ajinkya Rahane News: रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेचे विजेतेपद गुरुवारी (14 मार्च) मुंबई संघाने जिंकले. अंतिम सामन्यात विदर्भाला 169 धावांनी पराभूत करत मुंबईने तब्बल 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरले. दरम्यान, हा सामना मुंबईचा क्रिकेटपटू धवल कुलकर्णीच्या कारकिर्दीतील अखेरचा होता. या सामन्यानंतर धवल कुलकर्णीने निवृत्तीची घोषणा केली आहे.
दरम्यान, धवल कुलकर्णीसाठी मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने हा सामना आणखीच खास बनवला. रहाणेने सामना संपवण्यासाठी तुषार देशपांडे ऐवजी कुलकर्णीकडे चेंडू सोपवला होता. रहाणेच्या या कृतीमुळे कुलकर्णी भावूकही झाला होता.
या सामन्यात मुंबईने विदर्भासमोर विजयासाठी तब्बल 538 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या दिवशी विदर्भाला विजयासाठी 290 धावांची गरज होती, तर मुंबईला 5 विकेट्सची गरज होती.
परंतु, विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांनी अखेरच्या दिवशी मुंबईला सुरुवातीला मोठे यश मिळू दिले नव्हते. वाडकरने शतकही झळकावले, तर हर्ष दुबेने अर्धशतक केले होते. परंतु, वाडकरचा अडथळा तनुष कोटीयनने 130 व्या षटकात दूर केला.
त्याने वाडकरला 102 धावांवर पायचीत केले. त्यानंतर पुढच्या पाच षटकात विदर्भाने सर्व विकेट्स गमावल्या. 131 व्या षटकात तुषारने हर्ष दुबेलाही ६५ धावांवर माघारी धाडले. यानंतर आदित्य सरवटे आणि यश ठाकूर यांना झटपट बाद करण्याच कोटीयन आणि तुषार यांना यश मिळाले.
यावेळी फॉर्ममध्ये असणाऱ्या तुषारकडेच चेंडू गोलंदाजीसाठी दिला जाईल, अशी सर्वांना आशा होती. परंतु, रहाणेने अखेरची विकेट घेण्यासाठी कुलकर्णीकडे चेंडू सोपवला. त्यानेही रहाणेचा हा विश्वास कायम ठेवत त्याने उमेश यादवला त्रिफळाचीत केले.
यासह कुलकर्णीने मुंबईच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले. दरम्यान, कुलकर्णीने या सामन्यात पहिल्या डावातही शानदार गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान, उमेश यादवला बाद केल्यानंतर धवल कुलकर्णीला संघसहकाऱ्यांनी आनंदाने मिठी मारल्यानंतर त्याचे डोळेही पाणावले होते. जवळपास दीड दशक कुलकर्णी मुंबईसाठी खेळला आहे.
सामन्यानंतर रहाणेने दाखवलेल्या औदार्याबद्दल कुलकर्णीने आभारही मानले. तो म्हणाला, 'क्रिकेटपटूचे एक स्वप्न असते की त्याने सुरुवात आणि शेवट शानदार करावे. हा माझ्यासाठी 6 वा अंतिम सामना होता आणि मी पाचव्यांदा विजयाचा भाग झालो. माझ्यासाठी हा विजय खूप जवळचा असेल.'
'रहाणेने सामना संपवण्यासाठी माझ्याकडे चेंडू सोपवेल, अशी मला अपेक्षा नव्हती, पण मी तुषारचेही कौतुक करेल, कारण त्याने एकाच षटकात दोन विकेट्स घेतल्यानंतरही मला गोलंदाजी करू दिली. मला अनुभव मिळाला आहे, कारण मी अनेक दिग्गजांबरोबर खेळलो, त्यांनी मला त्यांचे अनुभव सांगितले. आता मी माझे अनुभव युवा खेळाडूंना देईल.'
धवलने त्याच्या कारकिर्दीत भारताकडून 12 वनडे आणि 2 टी20 सामनेही खेळले आहेत. त्याने त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 95 प्रथम श्रेणी सामने खेळताना 281 विकेट्स घेतल्या. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 130 सामने खेळताना 223 विकेट्स घेतल्या, तर त्याने 162 टी20 सामने खेळले असून 154 विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, मुंबईने तब्बल 8 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रणजी ट्रॉफीवर नाव कोरले आहे. तसेच मुंबई रणजी ट्रॉफीमधील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी 42 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.