Pakistan Captaincy : पाकिस्तान क्रिकेटमध्ये काही ना काही बदल सातत्याने दिसून येत आहेत. आता जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपपूर्वी संघाच्या कर्णधारपदात मोठा बदल होऊ शकतो, अशी बातमी समोर आली आहे.
बाबरने कर्णधारपद सोडून चार महिनेही उलटले नाहीत आणि पीसीबी त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये पुन्हा कर्णधार बनविण्याच्या विचारात आहे. वृत्तानुसार, शान मसूद आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याच्या क्षमतेवर पीसीबीचा विश्वास उडाला आहे. पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करण्यासाठी माजी कर्णधार बाबर आझम हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे त्यांना वाटत आहे.
बाबरने गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर पाकिस्तानच्या सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडले होते. यानंतर मसूदला टेस्ट फॉरमॅटमध्ये तर शाहीनला टी-20मध्ये कर्णधारपद देण्यात आलं. आता पीसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, बोर्ड या निष्कर्षापर्यंत पोहोचला आहे की कोणताही पर्याय उपलब्ध नाही, बाबर हा पुन्हा संघाचे नेतृत्व करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
सूत्राने पुढे सांगितले की, बाबर पुन्हा पदभार स्वीकारण्यास तयार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी काही विश्वासू लोकांना पाठवले आहे. मात्र, बाबरने स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. वरवर पाहता त्याला बोर्डाच्या अध्यक्षांकडून काही आश्वासन हवे आहे.
जका अश्रफ पीसीबीचे अध्यक्ष असताना वर्ल्डकपनंतर लगेचच बाबरला पांढऱ्या चेंडूच्या फॉर्मेटमध्ये कर्णधारपदावरून हटवण्यात आले. यानंतर त्याने लाल चेंडूच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
बाबरने 2023 पासून सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधारपद भूषवले होते, मात्र आशिया कप आणि वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीमुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.