Dhruv Jurel News: भारतीय संघाने जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान इंग्लंड विरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला. या मालिकेत भारताकडून अनेक युवा खेळाडूंनी विजयात मोलाचा वाटा उचलला.
यात ध्रुव जुरेलचाही समावेश आहे. दरम्यान, त्याने केलेल्या कामगिरीमुळे त्याची भारताचा माजी यष्टीरक्षक एमएस धोनीशी तुलनाही झाली, याबद्दल आता त्यानेच भाष्य केले आहे.
इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना धोनीचं घरचं मैदान असलेल्या रांचीमध्ये झाला होता. याच सामन्यात जुरेलने 90 आणि नाबाद 39 धावांची शानदार खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला त्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.
दरम्यान, त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाला एक चांगला यष्टीरक्षक मिळाल्याची चर्चा सुरू झाली. त्यातच भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी त्याची तुलना धोनीशी केली होती.
त्यांनी म्हटले होते की धोनी जरी एकच असला, तरी जुरेलकडे धोनीप्रमाणेच परिस्थितीची जाण आहे. तो धोनीप्रमाणे होऊ शकतो.
गावसकरांनी जुरेलची तुलना धोनीबरोबर केल्याबद्दल आता त्यानेच इंडिया टूडेच्या कॉन्क्लेवमध्ये बोलाताना प्रतिक्रिया दिली आहे. जुरेल म्हणाला, 'गावसकर सर माझी तुलना धोनी सरांबरोबर करण्याबद्दल धन्यवाद. पण मी वैयक्तिकरित्या असेच म्हणेल की धोनी सरांनी जे केले आहे, त्याची पुनरावृत्ती कोणीही करू शकत नाही.'
जुरेल पुढे म्हणाला, 'इथे फक्त एकच धोनी आहे, होता आणि पुढेही राहिल. माझ्यासाठी मला फक्त ध्रुव जुरेल रहायचे आहे. मी जे काही करेल, ते मला ध्रुव जुरेल म्हणून करायचे आहे. पण धोनी सर दिग्गज आहेत आणि ते नेहमीच दिग्गज राहतील.'
कसोटीत खेळण्याबद्दल जुरेल म्हणाला, 'मला अजूनही विश्वास होत नाहीये की मी कसोटीत पदार्पण केले आणि मी सामनावीरही ठरलो. क्रिकेटचं जे खरं स्वरुप आहे अशा कसोटी क्रिकेटमध्ये खेळणे आनंददायी होते. मला हे माहित होते की एक दिवस मी कसोटी क्रिकेट नक्की खेळले, त्यामुळे हे माझ्यासाठी स्वप्न साकार होणारा क्षण होता.'
दरम्यान, जुरेलसाठी धोनी आदर्श असल्याचे त्याने यापूर्वीही अनेकदा सांगितले होते. जुरेल आता आयपीएल 2024 स्पर्धेत खेळेल. या स्पर्धेत तो राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.