T20 World Cup sakal
क्रिकेट

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील सामने तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी सुरू होणार आहेत. पूर्ण प्रकाशझोतात ही स्पर्धा होणार असल्यामुळे चार फिरकी गोलंदाज आवश्यक आहेत, म्हणून आम्ही त्यास प्राधान्य दिले, एवढेच मी आता सांगेन. उर्वरित डावपेच मी आता जाहीर करणार नाही, असे मत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले. जून महिन्यात होत असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ निवड झाल्यानंतर आज मुंबईत रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची आज पत्रकार परिषद झाली. रोहितने नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत काही प्रश्नांना उत्तरे दिली.

१५ खेळाडूंच्या या संघात चार फिरकी गोलंदाजांना स्थान देताना केवळ तीनच प्रमुख वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. या मुद्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. रोहितने याबाबत स्पष्टीकरण देताना काही हुकमाचे पत्ते एवढ्यात जाहीर करणार नसल्याचे सांगितले. अंतिम संघ रचना कशी असेल हे आम्ही विंडीज-अमेरिकेत गेल्यावर तेथील खेळपट्ट्या पाहून ठरवू, सराव सामनेही खेळल्यानंतर सर्व पर्याय खुले असतील आणि प्रत्येकाचा अंतिम संघ निवडीच्या वेळी विचार केला जाईल, असे रोहित म्हणाला.

म्हणून सकाळचे सामने एरवी व्हाईटबॉल क्रिकेट स्पर्धा प्रकाशझोतात होत असतात, पण विंडीज आणि अमेरिका यांचा आणि प्रामुख्याने भारताच्या टाईमझोनमध्ये मोठा फरक आहे. भारतात प्राईम टाईमला सामने दिसण्यासाठी विंडीज आणि अमेरिकेत तेथे सकाळी स्पर्धा होणार आहे. हाच मुद्दा रोहित आणि निवड समितीने संघ निवडीच्या वेळी प्राधान्याने घेतला.

आयपीएल अगोदरच संघाचा विचार

आयपीएलमधील कामगिरीवर निवड समितीचे लक्ष आहेच, पण या ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी संघ रचना कशी असावी आणि कोणकोणते खेळाडू असू शकतील हा विचार आम्ही आयपीएल सुरू होण्याअगोदरच केला होता, असे रोहितने सांगितले. आयपीएलमधील कामगिरी प्रत्येक दिवशी कशी बदलत असते हे आपण सर्वच जण पहात आहोत, असेही रोहित म्हणाला.

या स्पर्धेसाठीच्या खेळपट्ट्या काहीशा संथ असू शकतील. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाज आणि फिनिशर महत्त्वाचा ठरू शकेल. शिवम दुबेने आयपीएलमध्ये आपली क्षमता दाखवलेली असली तरी केवळ याच कामगिरीच्या जोरावर त्याची निवड केलेली नाही. त्याने मुंबई संघातून खेळतानाही असेच योगदान दिलेले आहे.

हार्दिकची उपकर्णधारपदी नियुक्ती करताना आम्ही दुसरा कोणताही विचार केला नाही. त्याने या अगोदरही आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. केवळ प्रश्न त्याच्या तंदुरुस्तीचा होता. या आयपीएलमध्ये तो मुंबई संघातून सर्व १० सामने खेळला आहे आणि अधूनमधून संघाला गरज असताना गोलंदाजीही केलेली आहे. विश्वकरंडक स्पर्धेत तो महत्त्वाचा खेळाडू ठरू शकेल, असा विश्वास अजित आगरकर यांनी व्यक्त केला.

रिंकूची क्षमता गेल्या आयपीएलमध्ये पाहिलेली आहे. त्यानंतर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले होते; परंतु यावेळी त्याला संधी मिळाली नाही. त्याला अंतिम ११ खेळाडूंतून वगळणे हा आमच्यासाठी सर्वात कठीण निर्णय होता. त्याने काहीही चुकीचे केलेले नाही. तरीही असे निर्णय घ्यावे लागतात, असे स्पष्टीकरण आगरकर यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT