Abhishek Sharma on Maiden Century: भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (७ जुलै) झिम्बाब्वेविरुद्ध टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात १०० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या भारताच्या या विजयात २३ वर्षीय अभिषेक शर्माने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.
अभिषेकने ४७ चेंडूत १०० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ८ षटकार मारले. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. दरम्यान, अभिषेकने ही खेळी त्याचा लहानपणीचा मित्र आणि भारताचा कर्णधार शुभमन गिलच्या बॅटने खेळताना केली. त्याने या सामन्यात गिलची बॅट का वापरली होती, याबद्दल खुलासा केला आहे.
खरंतर शनिवारी (६ जुलै) भारताकडून झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या टी२० मधून अभिषेकने पदार्पण केले होते. मात्र, तो शुन्यावरच बाद झाला. परंतु, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्याने दमदार शतक केले.
त्याला दुसऱ्या सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर तो म्हणाला, 'आज मी शुभमन गिलच्या बॅटने खेळायला आलो होतो. त्यासाठी मी शुभमन गिलचे आभार मानतो. मला वाटते १२ वर्षांखालील क्रिकेटपासूनच ही गोष्ट माझ्यासाठी काम करते.'
'जेव्हाही मला असं वाटतं की हा दबावाचा सामना आहे किंवा असा सामना ज्यात माझी कामगिरी महत्त्वाची असणार आहे, तेव्हा मी बऱ्याचदा त्याची बॅट घेतो. आयपीएलमध्येही मी बऱ्याचदा त्याची एक बॅट मागत असतो. त्याने ही बॅट मला दिली, म्हणून मला वाटतं की ही खेळी चांगली राहिली.'
तो पुढे असंही म्हणाला की पहिल्या सामन्यातील पराभव निराशाजनक होता. अभिषेक म्हणाला, 'मला वाटते मी चांगली खेळी खेळली. आम्हाला पहिल्या टी२० सामन्यांत जो पराभव मिळाला, तो कठीण होता. पण आज माझा दिवस होता आणि मी त्याचा फायदा उचलला. मला वाटते टी२० मध्ये लय असणे महत्त्वाचे असते आणि मी तेच केले.'
याबरोबरच अभिषेकने त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांचेही आभार मानले.
तो म्हणाला, 'मी प्रशिक्षक, कर्णधार आणि संघव्यवस्थान यांचे मला आत्मविश्वास देण्याबद्दल आभार मानतो. मला वाटते एक युवा खेळाडू म्हणून जेव्हाही मी तुमचा दिवस असतो, तेव्हा स्वत:ला व्यक्त करायचे असते.'
'मी ऋतुराज गायकवाडसोबत प्रत्येक षटकानंतर बोलत होतो. माझा माझ्या क्षमतेवर विश्वास आहे आणि जर माझ्या टप्प्यात चेंडू पडला, तर मी मोठा फटका मारणारच.'
दरम्यान, आता भारतचा झिम्बाब्वेविरुद्धचा तिसरा टी२० सामना १० जून रोजी खेळवला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.