India vs Bangladesh 2nd T20I: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. मात्र, नंतर नितीश कुमार रेड्डीने केलेल्या घणाघाती हल्ल्यामुळे भारतीय संघाने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली. त्याला रिंकु सिंगचीही चांगली साथ मिळाली.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद २२१ धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशसमोर विजयासाठी २२२ धावांचे आव्हान भारताने ठेवले आहे.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताकडून पहिल्या षटकात १५ धावा फटकावत अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी दमदार सुरूवात केली होती.
परंतु, सॅमसन १० धावांवर, अभिषेक १५ धावांवर तर कर्णधार सूर्यकुमार यादव ८ धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताने ६ षटकातच ३ विकेट्स गमावत ४५ धावा केल्या होत्या.
पण यानंतर नितीश कुमार रेड्डी आणि रिंकु सिंगने भारताचा डाव तर सावरलाच पण आक्रमक खेळही केला. सुरुवातीला धिमी सुरुवात केलेल्या नितीशने नंतर मोठे फटके खेळत २७ चेंडूतच पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले. त्यानंतरही त्याने आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता.
मात्र अखेर त्याची ही वादळी खेळी मुस्तफिजुरने संपवली. त्याने १४ व्या षटकात मेहदी हसन मिराजच्या हातून झेलबाद केले. नितीशने ३४ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली.
तो बाद झाल्यानंतरही रिंकूने आक्रमक खेळ केला होता. त्यानेही २६ चेंडूत अर्धशतक केले. पण अर्धशतकानंतर तो बाद झाला. त्याने २९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. रिंकु आणि नितीश यांच्यात ४९ चेंडूतच १०८ धावांची भागीदारी झाली. त्यांची ही चौथ्या विकेटसाठीची भारतासाठी तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली.
हे दोघे बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रियान पराग यांनी भारताचा डाव पुढे नेला. मात्र, आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात १९ व्या षटकात रियान ६ चेंडूत १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर बांगलादेशने २० व्या षटकात पुनरागमन केले आणि भारतीय फलंदाज मोठे फटके मारायच्या नादात बाद झाले.
हार्दिक पांड्या १९ चेंडूत ३२ धावांवर बाद झाला. तसेच वरुण चक्रवर्ती शुन्यावर, तर अर्शदीप सिंग एक षटकार मारून बाद झाला. पण तोपर्यंत भारताने २२१ धावा उभारल्या होत्या.
बांगलादेशकडून रिशाद हुसैनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच तस्किन अहमद, तांझिम हसन साकिब आणि मुस्तफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.