राजकोट : म्हटले तर धावांचा डोंगर, फिरकीचे कमालीचे प्राबल्य, असा विरोधाभास असलेल्या राजकोटच्या मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यास सुरुवात होत आहे. चांगली खेळपट्टी असली तरी पहिले दोन कसोटी सामने चार दिवसांत संपले होते. या पार्श्वभूमीवर राजकोटमध्ये कोण आणि किती ‘राज’ करणार यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
एकीकडे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स १०० वा कसोटी सामना खेळत आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघाची मधली फळी नवख्या फलंदाजांची आहे. रजत पाटीदार गेल्या सामन्यात आपला पहिला सामना खेळला, तर आज सर्फराझ खान आणि यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ध्रुव जुरेलला पदार्पणाची संधी मिळणार आहे. या नव्या पिढीवर भारतीय संघाची मोठी मदार असणार आहे.
विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव, के एल राहुल अजून दुखापतीतून सावरला नसल्याने आणि श्रेयस अय्यरला संघातून काढून टाकल्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची मधली फळी खूप अननुभवी दिसणार आहे. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि मोठ्या कालखंडानंतर गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केलेल्या शुभमन गिलवर भारतीय संघाची मुख्य मदार असणार आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर कसोटी पदार्पण करायची संधी मिळणाऱ्या सर्फराज खानच्या फलंदाजीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
अक्षरऐवजी जडेजा
गोलंदाजीत रोहित शर्मा दोन बदल करायची शक्यता दिसते आहे. रवींद्र जडेजा संघात परतल्याने अक्षर पटेलला बाहेर बसवले जाईल आणि मुकेश कुमारच्या जागी मोहम्मद सिराजला जागा मिळेल असे वाटते. जसप्रीत बुमराने दोन दिवस भारतीय संघाच्या सरावात भाग न घेतल्याने पत्रकारांच्या गटात बुमरा खेळणार की नाही अशी चर्चाही ऐकायला मिळाली.
खेळपट्टीचे गुपित काय?
राजकोटच्या निरंजन शहा क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी नक्की काय रंग दाखवणार, या गोष्टीवर सामन्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. कधी कधी चार दिवसांच्या रणजी सामन्यात एक डाव कसाबसा पूर्ण होतो. अशा फलंदाजीला पोषक खेळपट्टी इथे असते, तर कधीतरी दोन दिवसांत दोन इनिंग पूर्ण होणारी भिंगरी खेळपट्टीही असते. तिसऱ्या कसोटी सामन्याची खेळपट्टी पहिले दोन दिवस फलंदाजीला पोषक असेल असे वाटते आहे. नंतर जर गरम हवेने आणि बुटांच्या खिळ्यांनी माती मोकळी झाली तर चेंडू हळूवार नाही तर हातभर वळेल असे वाटते .
इंग्लंड दोन वेगवान गोलंदाजांसह
इंग्लंड संघातून मार्क वूड जिमी अँडरसनला साथ देणार आहे. अशा प्रकारे इंग्लंड दोन वेगवान गोलंदाजांसह खेळणार आहे. पहिल्या दोन कसोटीत एकाच वेगवान गोलंदाजासह खेळले होते. बशीरला बाहेर बसवताना व्हिसाची अडचण दूर झालेल्या आणि गेल्या दोन सामन्यांत चांगला खेळ करणाऱ्या रेहान अहमदला संघात कायम ठेवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.