Team India News: जून 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा होऊ शकते.
दरम्यान, या स्पर्धेसाठी भारतीय संघात विराट कोहलीचीही निवड व्हायला हवी अशी प्रतिक्रिया भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने दिली आहे.
खरंतर काही दिवसांपूर्वीच अनेक मीडियातील रिपोर्ट्सनुसार आगामी टी२० वर्ल्डकपसाठी भारताच्या संघात विराट कोहलीला स्थान न देण्याचा विचार निवड समिती विचार करत असल्याचे समोर आले होते.
विराटसाठी आयपीएल 2024 मधील कामगिरी चांगली झाली, तरच त्याचा विचार केला जाईल असेही म्हटले जात आहे. अशातच आता इरफानने विराटच्या स्ट्राईक रेटचे उदाहरण देत तो टी20 वर्ल्डकपसाठीच्या संघात जागा मिळवण्यासाठी योग्य असल्याचे म्हटले आहे.
1 जून ते 29 जून 2024 दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या या टी20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल, अशी माहिती बीसीसीआयचे सचीव जय शाह यांनी यापूर्वीच दिली आहे.
अशात विराटही संघात असेल, तर भारतीय संघासाठी तो महत्त्वाचा ठरू शकतो असे मत इरफानने व्यक्त केले. तसेच त्याने 2022 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तानविरुद्ध विराटने केलेल्या 53 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळीचीही आठवण करून दिली आहे.
इरफान इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला, 'लोक विराटबद्दल बोलत आहेत, त्यामुळे मला हे सांगायला आवडेल की त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर टी20 क्रिकेटमधील स्ट्राईकरेट हा ख्रिस गेल इतकाच चांगला आहे किंवा खरंतर गेलपेक्षाही चांगला आहे.'
'भारताच्या पॉवर हिटर्सचा विचार करायचा जरी झाला तरी हार्दिक पांड्याचा स्ट्राईक रेट 139 आहे, तर विराटचा 137 आहे, त्यात फार फरक नाही. रोहित शर्माही साधारण 139 आहे आणि विराटचा 137. पाकिस्तानविरुद्ध त्याने केलेली नाबाद 82 धावांची खेळी आठवा.'
'ज्यावेळीही तुमच्या मनात त्याच्याबद्दल प्रश्न उभा राहिल, तेव्हा तो मोठ्या स्तरावरील खेळाडू आहे, तो एक मॅच विनर आहे आणि धावांचा पाठलाग कसा करायचा हे त्याला माहित आहे, हे नेहमीच लक्षात ठेवा. तो दबावात चांगला खेळतो. त्यामुळे त्याच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात काहीच अर्थ नाही.'
दरम्यान इरफानने टी20 वर्ल्डकप 2024 साठी भारतीय संघात कोणाकोणाला संधी मिळायला हवी, याबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे. त्याने अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा यांची निवड केली.
तसेच त्याने म्हटले की यष्टीरक्षक म्हणून केएल राहुल, ऋषभ पंत आणि जितेश शर्मा यांच्यापैकी दोघांची निवड व्हायला पाहिजे, पण तरी त्याने पंत आणि जितेशला अधिक पसंती दिली. याशिवाय कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांना फिरकीपटू म्हणून निवडले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.