India vs New Zealand Test Series: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारपासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता चालू होईल. पण हा सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज बेन सिअर्स संपूर्ण कसोटी मालिकेतूनच बाहेर झाला आहे.
बेन सिअर्स याला गुडघ्याची दुखापत झाली आहे. त्यामुळे तो न्यूझीलंड संघातून बाहेर झाला आहे.
गेल्या आठवड्यात सिअर्स याचे न्यूझीलंडमध्येच स्कॅन करण्यात आले होते. त्याने गेल्या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर असताना सरावावेळी त्याच्या डाव्या गुडघ्यामध्ये वेदना जाणवत असल्याची तक्रार केली होती.
त्यानंतर आता त्याचे स्कॅन करण्यात आले असून त्यात दुखापत असल्याचं आढळलं. त्यामुळे तो न्यूझीलंडच्या इतर खेळाडूंबरोबर भारतात आला नव्हता. यानंतर आता अखेर त्याला त्याच्या दुखपतीवर उपचाराची गरज असल्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आल्याने तो भारत दौऱ्यातून बाहेर झाला आहे.
सिअर्सऐवजी जेकॉब डफी याला बदली खेळाडू म्हणून न्यूझीलंड संघात आता संधी मिळाली असून तो बुधवारी भारतात येणार आहे. जेकॉब डफी याचे अद्याप कसोटी पदार्पण झालेलं नाही. त्यामुळे या मालिकेतून त्याला पदार्पणाची संधी मिळू शकते.
डफी याने न्यूझीलंडसाठी ६ वनडे आणि १४ टी२० सामने खेळले आहेत. त्याने वनडेत ११ आणि टी२०मध्येही ११ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला १०२ प्रथम श्रेणी सामने खेळण्याचाही अनुभव असून त्याने २९९ विकेट्स घेतल्या आहेत.
बंगळुरूला होणाऱ्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विलियम्सनही खेळणार नाही. त्याला श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत खेळताना गेल्या महिन्यात मांड्यांजवळ वेदना जाणवल्या होत्या.
त्यामुळे तोही भारत दौऱ्यावर इतर खेळाडूंसह आलेला नाही. पण तो दुसऱ्या सामन्याआधी भारतात येऊ शकतो. दरम्यान, पहिल्या सामन्यात त्याच्या जागेवर मार्क चॅमपनला संधी मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.