India Won ICC T20 World Cup 2007 Sakal
क्रिकेट

On This Day: आठवणीतील पहिला टी२० वर्ल्डकप अन् भारताला जेतेपद, धोनी बनलेला विश्वविजेता कर्णधार

Pranali Kodre

On This Day in Cricket 24th September: जून २०२४ च्या अखेरीस भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात टी२० वर्ल्ड कप उंचावला. भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला होता, तेही तब्बल १७ वर्षांनंतर. यापूर्वी भारताने पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला होता तो २००७ मध्ये.

आज याच भारताच्या पहिल्या-वहिल्या टी२० वर्ल्ड कप विजयाला १७ वर्षे पूर्ण होत आहेत. १९८३ नंतर भारतीय संघ वर्ल्ड कप विजेता होण्याच्या प्रतिक्षेत होता. २४ वर्षे यासाठी वाट पाहावी लागली. या २४ वर्षात क्रिकेट मोठ्या प्रमाणात बदललं. नाही हो म्हणता म्हणता टी२० क्रिकेट सुरू झालं आणि पहिला टी२० वर्ल्ड कपचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत २००७ साली करण्यात आलं.

या स्पर्धेच्या आधीच अनेक वरिष्ठ भारतीय खेळाडूंनी टी२० न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताला युवा संघ या स्पर्धेसाठी पाठवावा लागला. त्यावेळी एमएस धोनीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. धोनीने पहिल्यांदाच भारताच्या नेतृत्वाची धुरा हाती घेतली आणि तीही थेट आयसीसीच्या नव्या स्पर्धेत. कोणाला त्याच्या संघाकडून फारशा अपेक्षाही नव्हत्या. पण असं असलं तरी संघानं मात्र आपली कामगिरी चोख बजावली.

पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध बरोबरी झाल्यानंतर बॉलआऊटमध्ये अविस्मरणीय विजय मिळवला आणि स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरूवात केली. पण नंतर न्यूझीलंडने भारताला पुढच्या सामन्यात पराभूत केले. पण नंतर दिसला युवराज सिंगचा तो आक्रमक अंदाज, ज्याला आजपर्यंत कोणीही विसरू शकलेलं नाही.

भारताने इंग्लंडला पराभूत केलं, त्याच सामन्यात युवराजने स्टूअर्ट ब्रॉडविरुद्ध ६ चेंडूत ६ षटकार मारले होते. त्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेलाही पराभूतही केले होते. यानंतर झाला उपांत्य सामना, ज्यात भारताने ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा धक्का दिला आणि अंतिम फेरीत धडक मारली.

पण अंतिम फेरीत भारतासमोर पुन्हा आव्हान उभे ठाकले ते पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं. भारत आणि पाकिस्तान संघात २४ सप्टेंबर २००७ रोजी अंतिम सामना झाला. अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताकडून गौतम गंभीर आणि युसूफ पठाण सलामीला फलंदाजीला उतरले. मात्र युसूफला मोहम्मद असीफने १५ धावांवरच, तर नंतर रॉबिन उथप्पाला सोहेल तन्वीरने ८ धावांवर बाद केले. युवराज आणि धोनीही फार काही करू शकले नाही. या दोघांनाही अनुक्रमे १४ आणि ६ धावांवर उमर गुलने बाद केले.

पण या विकेट जात असताना गंभीर मात्र एकाग्रतेने खेळत होता. त्याने अनेक चांगले शॉट्सही खेळले. पण तोही १८ व्या षटकात ५४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ७५ धावा करून बाद झाला. उमर गुलच्या गोलंदाजीवर त्याचा झेल मोहम्मद असिफने घेतला. प

ण अखेरीस त्यावेळी अवघा २०-२१ वर्षांचा असलेल्या रोहित शर्माने १६ चेंडूत नाबाद ३० धावांची खेळी करत भारताला २० षटकात ५ बाद १५७ धावांपर्यंत पोहचवलं. पाकिस्तानकडून उमर गुलने ३ विकेट्स घेतल्या होत्या, तर मोहम्मद असिफ आणि सोहेल तन्वीर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली होती.

त्यानंतर पाकिस्तान संघ १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला. पण पहिल्याच षटकात मोहम्मद हाफिजला अवघ्या एका धावेवर आरपी सिंगने बाद केले. त्यानंतर कमरान अकमललाही आरपी सिंगने शुन्यावरच माघारी धाडलं. तरी नंतर इम्रान नाझीर आणि युनूस खान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

पण उथप्पाने १४ चेंडूत ३३ धावा करणाऱ्या इम्रानला धावबाद केले. ९ व्या षटकात जोगिंदर शर्माने युनूस खानला २४ धावांवर बाद केलं.

त्यानंतर उरफान पठाणने पाकिस्तानची मधली फळी खिळखिळी केली. त्याने शोएब मलिकला ८ धावावंर, शाहिद आफ्रिदीला तर पहिल्याच चेंडूवर माघारी धाडलं. त्याने यासिर अराफतलाही १५ धावांवर बाद केलं. तरी ४ चेंडून सोहेल तन्वीरने महत्त्वाच्या १२ धावा केल्या. पण त्याच अडथळा श्रीसंतने त्याला त्रिफळाचीत करत दूर केला.

परंतु असलं तरी मिस्बाह-उल-हक फलंदाजी करत होता. अखेरच्या दोन षटकात पाकिस्तानला २० धावांची गरज होती. पण आरपी सिंगने फक्त ७ धावा देताना उमर गुलला बाद केलं होतं. त्यामुळे अखेरच्या षटकात पाकिस्तानला हव्या होत्या १३ धावा, तर भारताला हवी होती एक विकेट.

याचवेळी हे शेवटचे षटक कोण टाकणार असा प्रश्न होता. धोनीकडे जोगिंदर शर्मा आणि हरभजन सिंग असे दोन पर्याय होते. परंतु, धोनीने जोगिंदरची निवड केली. पहिला चेंडू वाईड गेला. त्यानंतर पुन्हा हा चेंडू जोगिंदरने टाकला, ज्यावर मिस्बाहने एकही धाव काढली नाही. पण त्यांनंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने खणखणीत षटकार ठोकला होता.

त्यामुळे समीकरण अचानक ४ चेंडू ६ धावा असं झालं. पण जोगिंदरच्या तिसऱ्या चेंडूवर मिस्बाह स्कुप शॉट मारायला गेला पण शॉर्ट फाईन लेगला उभ्या असलेल्या श्रीसंतने कोणतीही चूक केली नाही आणि त्याने तो चेंडू झेलला आणि भारताचं नाव टी२० वर्ल्ड कपवर कोरलं गेलं. भारतीय संघाने ५ धावांनी हा सामना जिंकला.

भारत पहिल्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेचा विजेता ठरला. या स्पर्धेने टी२० क्रिकेटला बळ दिलं. भारतीय संघाचे मुंबईत ओपन बसमध्ये स्वागतही झाले. भारताने यानंतर टी२० क्रिकेट प्रकाराला गांभीर्याने घ्यायला सुरूवात केली. भारतात पुढच्याच वर्षात २००८ मध्ये भारतात आयपीएल स्पर्धेला सुरूवात झाली.

त्यानंतरच जे यश मिळालं, ते सर्वकाही सांगून गेलं की २००७ विश्वविजयाची किंमत काय होती. या स्पर्धेने भारताला सुपरस्टार कर्णधार धोनी दिला. या स्पर्धेने त्याच्या नेतृत्वाच्या युगाची सुरुवात झाली. याच स्पर्धेने अनेक युवा खेळाडूंना पुढे आणले. त्यामुळे ही स्पर्धा भारतीय चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Encounter: आणखी एक एन्काउंटर! दोन जवानांची रेल्वेतून फेकून हत्या; एक लाखाचे बक्षिस असलेल्याला पोलिसांनी संपवले

शाब्बास पोरींनो! पुण्याच्या लेकीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चीनला नमवले अन् ऐतिहासिक पदक जिंकले

... म्हणून प्रसाद ओकने केलं स्वप्नील जोशीचं कौतुक; पोस्ट करत म्हणाला-

Work Stress Management : कुटुंब आणि ऑफिसमध्ये भरडले जाऊ नका, असं करा नियोजन कामाचा ताप होणार नाही

F&O Traders: फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करताय सावधान! गेल्या तीन वर्षात गुंतवणूकदारांचे 1.81 लाख कोटी पाण्यात

SCROLL FOR NEXT