Jonny Bairstow Sakal
क्रिकेट

On This Day: आठ वर्षांचा असताना वडिलांना आयुष्य संपवताना पाहिलं, आई दोनदा कॅन्सरशी लढली, तरीही बेअरस्टो परिस्थितीला हरवत खंबीर उभा राहिला

Pranali Kodre

On This Day in Cricket 26th September: क्रिकेट या खेळाला अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोबाबतही काहीसं तसंच झालं, पण त्याने येईल त्या परिस्थितीवर मात करत पुन्हा उभे राहण्याची हिंमत ठेवली.

बेअरस्टो इंग्लंडच्या दिग्गज यष्टीरक्षक फलंदाजांपैकी एक आहे. त्याने इंग्लंडचे तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व केले. वेळ पडेल तेव्हा तो सलामीलाही खेळू शकतो आणि आठव्या क्रमांकावरही. त्यामुळे त्याचं महत्त्व आणखी वाढतं. पण त्याच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता, तर भावनिक होता.

घरची परिस्थिती वाईट नव्हती, पण आयुष्याने समोर अशा गोष्टी ठेवल्या होत्या की त्यातून बाहेर पडून स्वत:ला सिद्ध करणं कठीण होतं.

जॉनीचा जन्म यॉर्कशायरला २६ सप्टेंबर १९८९ रोजी झाला. त्याचे वडील डेव्हिड बेअरस्टो देखील क्रिकेटपटू होते. ते देखील यष्टीरक्षक फलंदाज होते आणि इंग्लंडसाठी खेळले देखील. त्यामुळे जॉनीमध्ये क्रिकेटबद्दल आपुलकी निर्माण होणारच होती. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा देशांतर्गत क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळले. त्यामुळे इंग्लंडमध्ये त्यांचं मोठं नाव होतं.

मात्र जॉनी अवघा ८ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी निराश्येच्या गर्तेत असताना स्वत:चं आयुष्य संपवलं. जॉनीची आई त्याला आणि त्याच्या बहिणीला फुटबॉल खेळण्यासाठी घेऊन गेलेली असताना त्याच्या वडिलांनी राहत्या घरात आयुष्य संपवलं होतं. जेव्हा हे घरी आले आणि वडिलांना अशा स्थितीत पाहिलं, तेव्हा बेअरस्टो कुटुंबाला मोठा धक्का बसला होता.

त्यावेळी आईलाही ब्रेस्ट कॅन्सर झालेला होता. त्यामुळे तिच्यावरही उपचार सुरू होते. त्यातच वडिलांनी इतकं मोठं पाऊल उचललं होतं. यामुळे जॉनीवरही बराच परिणाम झाला होता. त्याला लहान असताना वडिल असे सोडून गेले म्हणून रागही आला होता. त्यानं काही वर्षांपूर्वी एका मुलाखातीत असंही म्हटलं होतं की जर ते आत्ता असते तर त्यांनी त्याला मोठं होताना पहिलं असतं, खेळताना पाहिलं असतं, त्याला त्यांचं मार्गदर्शन मिळालं असतं, अनेक सुट्ट्या एकत्र घालवता आल्या असत्या.

पण नंतर जॉनी आणि त्याची धाकटी बहीण बेकी यांना त्यांच्या आईने सावरलं, मोठं केलं. जॉनी लहानपणे विविध खेळ खेळायचा. तो ७ वर्षे लीड्स युनायटेडकडून फुटबॉल खेळला. तो यॉर्कशायर स्कुलमध्ये रग्बी खेळायचा. लीड्ससाठी हॉकीही खेळायचा, पण शेवटी जॉनीनेही क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्याचा निर्णय घेताना वडिलांप्रमाणेच त्यानेही यष्टीरक्षण निवडले.

इतकंच नाही, तर त्यानेही वडिलांप्रमाणेच यॉर्कशायर क्लबकडून प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरूवात केली होती. त्यानंतर २०११ मध्ये जॉनीने कार्डिफमध्ये भारताविरूद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचवर्षी त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्येही पदार्पण केले.

यानंतर वर्षभरातच त्याने मे २०१२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर इंग्लंडसाठी कसोटी पदार्पण केले. पण त्याच्यासाठी पदार्पण खास राहिलं नाही. त्याला संघातूनही बाहेर जावं लागलं. मात्र काहीच दिवसात त्याला पुन्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात स्थान मिळालं. त्यात त्याने तिसऱ्या कसोटीत ९५ आणि ५४ धावांची खेळी केली आणि त्याचं कौशल्य दाखवले.

त्याने अनेकदा इंग्लंडसाठी महत्त्वाच्या खेळी केल्या. दरम्यान, सर्व चांगलं चालू असतानाच त्याच्या आईला पुन्हा कॅन्सरने घेरल्याचं समजलं. २०१२ मध्ये भारत दौऱ्यावर असताना पुण्यात सामना सुरू असताना त्याला अचानक आईला हॉस्पिटलमध्ये नेणार असल्याचं कळालं. त्यामुळे तो तातडीने घरी परतला होता. सुदैवानं त्याच्या आईने दुसऱ्यांदाही कॅन्सरला हरवले.

जॉनीनेही नंतर इंग्लंडसाठी क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले. अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. त्याला नंतर जॉस बटलरच्या रुपात एक स्पर्धकही मिळाला, पण असं असतानाही त्याने त्याची वेगळी ओळख जपली. आता बेअरस्टो बऱ्याचदा कसोटीत, तर बटलर वनडे आणि टी२० क्रिकेट खेळताना दिसतो.

बेअरस्टोने याचवर्षी म्हणजे मार्च २०२४ मध्ये धरमशाला येथे त्याच्या कारकिर्दीतील १०० वी कसोटी खेळली. यावेळी त्याने त्याचं हे यश त्याच्या आईला समर्पित केलं. त्याच्या या १०० व्या कसोटीवेळी त्याची आई आणि बहीण देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते.

आयुष्याने ज्या परीक्षा घेतल्या होत्या, त्यानंतर १०० कसोटी खेळण्याचा मान त्याला मिळाला होता. तो १०० वा कसोटी सामने खेळणारा केवळ १७ वा इंग्लंडचा खेळाडू ठरला होता. बेअरस्टो अद्यापही इंग्लंडच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे.

तो आयपीएलमध्येही खेळला आहे आणि आयपीएलमध्येही त्याने अनेक चांगल्या खेळी केल्या आहेत. त्याने २०१९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करताना पहिलाच हंगाम ४४५ धावा करत गाजवला होता.

बेअरस्टोची कारकिर्द

जॉनी बेअरस्टोने आत्तापर्यंत १०० कसोटी सामने खेळले आहेत आणि १२ शतके व २६ अर्धशतकांसह ६०४२ धावा केल्या आहेत. त्याने १०७ वनडेमध्ये ११ शतके आणि १७ अर्धशतकांसह ३८६८ धावा केल्या. तसेच ८० आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये त्याने १६७१ धावा केल्या आहेत.

त्याने २८७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील १३३ डावांमध्ये यष्टीरक्षण करताना २६१ विकेट्स घेतल्या, यामध्ये २४३ झेल आणि १८ यष्टीचीतचा समावेश आहे. बेअरस्टोने आयपीएलमध्ये ५० सामने खेळताना २ शतकांसह १५८९ धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT