क्रिकेटमध्ये विक्रम हे कायमस्वरूपी नसतात... आज झालेला विक्रम तो कधी ना कधी मोडला जाणाराच... पण, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील असा एक सामना झाला, ज्यात नोंदवले गेलेले विक्रम तोडायला फलंदाजांना बराच घाम गाळावा लागेल हे नक्की... हे विक्रम मोडले जाणारच असं नाही, पण थोडं अवघड आहेत हे नक्की...
२०१४ नंतर आशियाई स्पर्धेत क्रिकेटला पुनरागमनासाठी ९ वर्ष वाट पाहावी लागली. २०२३ मध्ये हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत नेपाळने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील जवळपास सर्व वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केले. मंगोलियाविरुद्धच्या या सामन्यात नेपाळने दणदणीत विजय मिळवला. दिपेंद्र सिंग ऐरीने ट्वेंटी-२०तील वेगवान अर्धशतकाचा युवराज सिंगचा ( १२ ) विक्रम मोडला. त्याने फक्त ९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याच सामन्यात कुशल मल्लाने ट्वेंटी-२०त वेगवान शतकाचा विक्रम नावावर केला. त्याने ३४ चेंडूंत शतक झळकावताना डेव्हिड मिलर, रोहित शर्मा व झेक प्रजासत्ताकच्या सुदेश विक्रमासेकरा यांचा ( ३५ चेंडू) वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. नेपाळने या दोन फलंदाजांच्या दमदार खेळीच्या जोरावर ट्वेंटी-२०तील सर्वोच्च धावांचा डोंगर उभा केला. त्यातही रेकॉर्ड ब्रेकिंग २६ षटकार लगावले गेले. इतकेच नव्हे तर नेपाळने ट्वेंटी-२० इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाचीही नोंद केली.
नेपाळने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ३१४ धावांचा डोंगर उभा केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी अफगाणिस्तानने २०१९ मध्ये आयर्लंडविरुद्ध ३ बाद २७८ धावांचा विक्रम नोंदवला होता. तो नेपाळने मोडला.
कुशल मल्ला व कर्णधार रोहित पौडेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १९३ धावांची भागीदारी केली. रोहित २७ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह ६१ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या दिपेंद्रने १० चेंडूंत ८ षटकार खेचून नाबाद ५२ धावांची खेळी केली. त्याने ९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना युवराजचा १२ चेंडूंत ( वि. इंग्लंड, २००७ वर्ल्ड कप) वेगवान अर्धशतकाचा विक्रम मोडला.
कुशल मल्ला ५० चेंडूंत ८ चौकार व १२ षटकारांसह १३७ धावांवर नाबाद राहिला. त्याने ३४ चेंडूंत शतक झळकावले आणि हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील वेगवान शतक ठरले होते. मिलर ( वि. बांगलादेश, २०१७) व रोहित ( वि. श्रीलंका, २०१७) यांचा ३५ चेंडूंचा विक्रम त्याने मोडला. इस्तोनियाचा साहिल चौहान ( २७ चेंडू वि. सायप्रस, २०२४) आणि नामिबियाचा जॅन निकोल लोफ्टी-इटन ( ३३ चेंडू वि. नेपाळ, २०२४) यांनी नंतर कुशलचा विक्रम मोडला.
या सामन्यात नेपाळने एकूण २६ षटकार खेचले आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील हा सर्वाधिक षटकारांचा विक्रम आहे. २०१९ मध्ये अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध २२ षटकार खेचले होते.
मंगोलियाचा संपूर्ण संघ ४१ धावांवर माघारी पाठवून नेपाळने २७३ धावांनी विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील हा सर्वात मोठा विजय ठरला. झेक प्रजासत्ताकने २०१९ मध्ये तुर्कीवर २५७ धावांनी विजय मिळवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.