Paul Stirling T20I Record: अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड संघात टी20 मालिकेला शुक्रवारपासून (15 मार्च) सुरुवात झाली आहे. शारशाहला झालेल्या या सामन्यात आयर्लंडने 38 धावांनी विजय मिळवला. याच सामन्यात आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली.
त्याने या सामन्यात 27 चेंडूत 25 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारला. यासह त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 400 चौकारांचा टप्पा पार केला. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 400 चौकार मारणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम कोणालाच करता आलेला नाही.
स्टर्लिंगच्या नावावर आता 135 टी20 सामन्यात 401 चौकार झाले आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत स्टर्लिंगपाठोपाठ बाबर आझम आहे. त्याने 109 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 395 चौकार मारले आहेत.
तसेच तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याने 361 चौकार मारले आहेत, तर चौथ्या क्रमांकावर असेलल्या रोहित शर्माने 359 चौकार मारले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे क्रिकेटपटू (आकडेवारी 16 मार्च 2024 पर्यंत)
401 चौकार - पॉल स्टर्लिंग (135 सामने)
395 चौकार - बाबर आझम (109 सामने)
361 चौकार - विराट कोहली (117 सामने)
359 चौकार - रोहित शर्मा (151 सामने)
320 चौकार - डेव्हिड वॉर्नर (103 सामने)
या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 149 धावा केल्या आणि अफगाणिस्तानला 150 धावांचे आव्हान दिले. आयर्लंडकडून हॅरी टेक्टरने सर्वोच्च 56 धावांची खेळी केली. तसेच अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 18.4 षटकात सर्वबाद 111 धावाच करता आल्या. अफगाणिस्तानकडून मोहम्मद इशाकने 32 धावांची खेळी केली. तसेच आयर्लंडकडून बेंजामिन व्हाईटने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.