Vidarbha vs Madhya Pradesh 1st Semi Final : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याचा परिचय रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील विदर्भ विरुद्ध कर्नाटक या उपांत्यपूर्व सामन्यातही आला. कधी पारडे विदर्भ तर कर्नाटकच्या बाजूने झुकत होते. शेवटच्या दिवशीचा खेळ सुरू झाला, त्यावेळी कर्नाटकची स्थिती मजबूत होती. मात्र, सामनावीर आदित्य सरवटे व डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबेने फासे टाकले आणि डाव विदर्भाच्या बाजूने पलटविला. अखेर १२७ धावांनी सामना जिंकून यजमानांनी दिमाखात उपांत्य फेरी गाठली.
शेवटच्या दिवशी फिरकीला साथ मिळते हा इतिहास विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्सच्या खेळपट्टीने कायम ठेवला. सकाळी कर्नाटकने डावाला सुरुवात केली, त्यावेळी त्यांना आणखी २६८ धावांची गरज होती व त्यांना ९० षटके खेळायची होती. मात्र, सरवटेने सर्वप्रथम मयंक अग्रवालचा अडथळा दूर केला. सकाळच्या या धक्क्यातून कर्नाटकच्या खेळाडू सावरत नाही तोच सरवटेने त्याच षटकात निकीन जोसला यश राठोडद्वारे टिपले आणि विदर्भाला वरचढ होण्याची संधी दिली.
अचानक डावाचे चित्र पालटल्याने कर्नाटकला बचावात्मक पवित्रा स्वीकारावा लागला. त्यातच आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या मनीष पांडेला सरवटेने पायचीत करून कर्नाटकची चार बाद १३१ अशी स्थिती करून टाकली होती.
सरवटेने आपले काम चोख बजावल्यावर हर्ष दुबेने कर्नाटकच्या फलंदाजांना जाळ्यात ओढणे सुरू केले. सर्वप्रथम त्याने हार्दिक राजला पायचीत करून आणखी दबाव वाढविला. त्यातच एक टोक सांभाळून खेळणारा के. व्ही. अनीश दुर्दैवाने धावबाद झाल्याने कर्नाटकला आणखी एक धक्का बसला. त्याने हार्दिक राजच्या साथीने ४० धावांची भागीदारी केली.
अनीश बाद झाल्यावर उर्वरित फलंदाज किती वेळ तग धरतात, हा मुद्दा शिल्लक होता. त्यातच विजयकुमार व व्ही. कवेरप्पा यांनी फटकेबाजी करून काही वेळासाठी विदर्भ संघावरील दबाव वाढविला होता. मात्र, दोघेही हर्ष दुबेच्या गोलंदाजीचे बळी ठरले. दोघांनी ३३ धावांची भागीदारी केल्याने कर्नाटकचा डाव २४३ धावांपर्यंत लांबला. आदित्य सरवटेची सलग दुसऱ्या सामन्यात सामनावीर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
आता उपांत्य फेरीत विदर्भाची लढत येत्या २ मार्चपासून मध्य प्रदेशविरुद्ध नागपुरातच होणार आहे. विशेष म्हणजे, विदर्भाने प्रथम विजेतेपद मिळविले, त्यावेळी प्रशिक्षक असलेले चंद्रकांत पंडित सध्या मध्य प्रदेशचे प्रशिक्षक आहेत.
संक्षिप्त धावफलक : विदर्भ पहिला डाव ४६०, कर्नाटक पहिला डाव २८६, विदर्भ दुसरा डाव १९६, कर्नाटक दुसरा डाव ६२.४ षटकात सर्वबाद २४३ (आर. समर्थ ४०, मयंक अग्रवाल ७०, के. व्ही. अनीश ४०, मनीष पांडे ०१, हार्दिक राज १३, व्ही. विजयकुमार ३४, ३७ चेंडू ३ चौकार, २ षटकार, व्ही. कवेरप्पा २५, २९ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, हर्ष दुबे ४-६५, आदित्य सरवटे ४-७८)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.