नवी दिल्ली : स्थानिक क्रिकेटला प्राधान्य न दिल्यामुळे बीसीसीआयने बुधवारी वार्षिक करारामधून श्रेयस अय्यर व ईशान किशन या दोन खेळाडूंना वगळल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, बीसीसीआयने छान पाऊल उचलले आहे; पण हा नियम प्रत्येक क्रिकेटपटूसाठी असायला हवा. रोहित शर्मा व विराट कोहली यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट नसताना स्थानिक स्पर्धांमध्ये खेळायला हवे.
कीर्ती आझाद पुढे सांगतात, सध्या खेळाडूंची पावले आयपीएलकडे वळतात. आयपीएलमुळे मनोरंजन होते; पण पाच दिवसांचे क्रिकेट हे अव्वल दर्जाचे असते. त्यामुळे खेळाडूंचा ओढा रणजी क्रिकेटकडेही असायला हवा. जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट नसते किंवा वेळ असतो तेव्हा स्थानिक क्रिकेट खेळायलाच हवे. रोहित शर्मा असो किंवा विराट कोहली यांनीही तसे करायला हवे. युवा खेळाडूंना स्थानिक क्रिकेटमधून भक्कम व्यासपीठ मिळते. अशा स्पर्धांमधून चमक दाखवल्यानंतर त्यांना राष्ट्रीय संघात प्रवेश करता येतो.
सर्वांना शिक्षा व्हायला हवी
बीसीसीआयने उचललेल्या पावलावर कीर्ती आझाद म्हणतात, बीसीसीआयकडून योग्य पुढाकार घेण्यात आला आहे; पण हा नियम सर्वांसाठी असायला हवा. प्रत्येक खेळाडूला एकाच नजरेने बघायला हवे. स्थानिक क्रिकेटकडे कानाडोळा करीत असलेल्या सर्वच खेळाडूंना शिक्षा व्हायला हवी. फक्त दोन खेळाडूंना शिक्षा करून उपयोग होणार नाही.
स्थानिक क्रिकेटला महत्त्व
कीर्ती आझाद यांनी स्थानिक क्रिकेटला महत्त्व देताना म्हटले की, बिशन बेदी, मदनलाल, सुरिंदर अमरनाथ, मोहिंदर अमरनाथ, चेतन चौहान, सुनील गावसकर, संदीप पाटील, करसन घावरी या आमच्या काळातील क्रिकेटपटू स्थानिक क्रिकेटला महत्त्व देत असे. प्रत्येक खेळाडूला आपआपल्या स्थानिक संघाकडून खेळण्याचा अभिमान वाटत असे; पण सध्याच्या युवा खेळाडूंमध्ये याचा अभाव दिसून येतो. आयपीएलकडे ते आकर्षित होतात. त्यामुळे स्थानिक क्रिकेटला दुय्यम समजले जाते असे वाटू लागते.
इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेटला महत्त्व
इंग्लंडचे क्रिकेटपटू हे कौंटी क्रिकेटला महत्त्व देतात. स्थानिक स्पर्धांमध्ये खेळून राष्ट्रीय संघात पुनरागमन करतात; पण भारतीय खेळाडू येथील स्थानिक स्पर्धांमधून खेळताना दिसत नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. सर्फराझ खान व ध्रुव जुरेल हे दोन्ही खेळाडू टी-२० क्रिकेटसोबत रणजी क्रिकेटही खेळतात. या दोन्ही खेळाडूंचे कौतुक आहे. या खेळाडूंचे अनुकरण गरजेचे आहे, असे कीर्ती आझाद पुढे स्पष्ट सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.