मुंबई : मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वात बदल होऊन रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याकडे सूत्रे गेली आहेत. रोहितचे योगदान अफलातून आहे. त्याचा हात माझ्या खांद्यावर (आशीर्वाद) असणारच आहेत, असे मत हार्दिक पांड्याने व्यक्त केले; परंतु नेतृत्वात बदल झाल्यानंतर आजपर्यंत त्याच्याशी संवाद झाला नसल्याचीही कबुली हार्दिकने दिली.
आयपीएलला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होत आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सची मोसमपूर्व पत्रकार परिषद आज झाली. त्यात हार्दिक पांड्या आणि मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी इतर प्रश्नांसह मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वात झालेल्या बदलाबाबतही स्पष्टीकरण दिले. गुजरात संघातून पुन्हा मुंबई संघात येणाऱ्या हार्दिककडे रोहित शर्माला दूर करून कर्णधारपद दिले याचे पडसाद मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांवर पडले आणि सोशल मीडियातून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हार्दिक पांड्याने याबाबत कोणतेच विधान केले नव्हते. आज पत्रकार परिषदेच्या निमित्ताने त्याला या बदलाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. सुवर्णमध्य साधत हार्दिकने हसत हसत उत्तरे दिली आणि कोठेही विसंवाद नसल्याचे दाखवून दिले.
रोहित शर्मा हा भारताचाही कर्णधार आहे, त्याच्या नेतृत्वाखाली मी भारतीय संघातूनही खेळलेलो आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये मी त्याच्याऐवजी नेतृत्व करणार असलो तरी फार काही वेगळे नसेल. रोहित नेहमीच मदतीला पुढे असतो, असे हार्दिकने सांगितले.
रोहितशी चांगले संबंध
रोहित शर्माने आत्तापर्यंत मुंबई इंडियन्सला जे यश मिळवून दिले तेच मला पुढे न्यायचे आहे, त्यामुळे रोहित मदतीला पुढे असेलच. आम्हा कोणासाठीही हा बदल अडचणीचा असणार नाही. गेली १० वर्षे आम्ही एकत्र खेळत आहोत, त्यामुळे दोघांमध्ये चांगले संबंध आहेत, अशी भावना हार्दिकने व्यक्त केली.
चाहत्यांच्या भावनांचा आदर
रोहितऐवजी माझी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी निवड केली, हे मुंबईच्या काही चाहत्यांना आवडले नाही, त्यांची नाराजी समजू शकतो; परंतु मी या चाहत्यांच्या भावनांचा आदर करतो, त्याचवेळी आम्ही खेळावर अधिक लक्ष केंद्रीत करतो. ज्या गोष्टी माझ्या आवाक्यात असतात त्याचाच अधिक विचार मी करतो. ज्याच्यावर मी नियंत्रण मिळवू शकत नाही, त्याचा विचार करत नाही. शेवटी प्रत्येक चाहत्याला त्याच्या भावना आणि मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो, असे पांड्या म्हणाला.
एकीकडे रोहितच्या आशीर्वादाबाबत बोलत असताना हार्दिकने रोहितबरोबर आपला नजीकच्या काळात संवाद झाला नसल्याचे मान्य केले. रोहित शर्मा भारतीय संघासोबत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी व्यग्र होता आणि आम्हीसुद्धा तयारीत गुंतलेलो होतो, त्यामुळे रोहितशी संपर्क झालेला नाही. रोहित संघात दाखल झाल्यावर आम्ही पुन्हा एकत्र असू, असे हार्दिकने प्रांजळपणे सांगितले.
पूर्ण तंदुरुस्त गोलंदाजीही करणार
विश्वकरंडक स्पर्धेत १९ ऑक्टोबर रोजी गुडघा दुखावलेला हार्दिक त्यानंतर क्रिकेटपासून पूर्ण दूर होता. गेल्या महिन्यात डी. वाय. पाटील टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळल्यानंतर हार्दिक खऱ्या अर्थाने आयपीएलमधून पुनरागमन करत आहे. आपण पूर्ण तंदुरुस्त असून गोलंदाजीही करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. आयपीएलमधील सर्व सामने खेळण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. दोन महिन्यांपूर्वीच मी तंदुरुस्त झालो होतो, त्यामुळे मी केवळ तीन महिने दुखापतीमुळे बाहरे होतो, असे म्हणता येईल. विश्वकरंडक स्पर्धेत झालेली गुडघा दुखापत सुरुवातीला साधी वाटत होती; परंतु त्यानंतर तिचा गंभीरपणा दिसून आला. रोहितबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रशिक्षक मार्क बाऊचर म्हणाले, रोहित सध्या कमालीच्या फॉर्मात आहे. आयपीएलमध्ये त्याच्याकडून अशाच खेळाची आम्ही अपेक्षा करून आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.