India vs Bangladesh T20I: भारतीय संघाने बांगलादेशला शनिवारी (१२ ऑक्टोबर) टी२० मालिकेतील हैदराबादला झालेल्या तिसऱ्या सामन्यात तब्बल १३३ धावांनी पराभूत केले. याबरोबरच या मालिकेत ३-० असा विजयही मिळवला.
तिसरा सामना भारतासाठी विक्रमी ठरला. दरम्यान भारताच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
संजू सॅमसन या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात मोठी खेळी करू शकला नव्हता. त्याला पहिल्या सामन्यात २९ आणि दुसऱ्या सामन्यात १० धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर टीकाही होत होती. त्याला तिसऱ्या सामन्यात संधी मिळणार की नाही, यावरही चर्चा झाली होती.
मात्र भारतीय संघव्यवस्थापनाने त्याच्यावरील विश्वास कायम करत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. त्यानेही तिसऱ्या सामन्यात त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवताना ४७ चेंडूत १११ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ८ षटकार मारले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील पहिले शतक ठरले.
सॅमसनने ही खेळी करताना कर्णधार सूर्यकुमार यादवबरोबर (७५ धावा) दुसऱ्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी केली. तसेच त्याने रिशाद हुसैनविरुद्ध १० व्या षटकात सलग ५ षटकार मारण्याचाही पराक्रम केला. त्याच्या या खेळामुळे तो तिसऱ्या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर संजू सॅमसन म्हणाला, 'ड्रेसिंग रुममध्ये खूप एनर्जी आहे आणि संघातील खेळाडू मला खूप आनंद देतात. मी खूप खुश आहे. मी चांगली कामगिरी केली म्हणून ते खुश आहेत. जेव्हा तुम्हाला माहित असतं की तुम्ही काय करू शकता आणि कशी फलंदाजी करू शकता, तुम्ही यापेक्षा चांगलं खेळू शकता, पण तसं होत नसतं तेव्हा ते खूप त्रासदायक होतं. हे सर्व विचार डोक्यात येत असतात.'
'मात्र मी आत्तापर्यंत खूप सामने खेळले आहेत, त्यामुळे आता मला दबाव आणि अपयश कसं हाताळायचं हे खूप चांगलं माहित झालं आहे. मी खूपवेळा अपयशी ठरलो आहे. त्यामुळे मला माझी मानसिकता कशी सांभाळायची माहित आहे. मी सतत मला सांगत असतो की प्रोसेसवर लक्ष केंद्रीत कर, ट्रेनिंग करत राहतो आणि स्वत:वर विश्वास ठेवतो की एक दिवस माझा नक्की येईल.'
सॅमसन पुढे म्हणाला, 'देशासाठी खेळताना तुमच्यावर दबाव असतो. यावेळीही दबाव होता, पण मला त्यावेळी फक्त खेळायचे होते आणि माझ्यात किती क्षमता आहे, हे दाखवायचे होते. मी एक-एक चेंडूवर लक्ष केंद्रीत करत होतो आणि माझे शॉट्स खेळत होतो.'
त्याचबरोबर भारतीय संघाकडून आणि कर्णधार सूर्यकुमार व प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल त्याने सांगितले.
तो म्हणाला, 'ड्रेसिंग रुममधील सदस्य आणि लीडरशीप ग्रुप मला नेहमी सांगत होते की तुझ्यात काय क्षमता आहे हे आम्हाला माहित आहे आणि आम्ही तुला पाठिंबा देऊ. त्यांनी फक्त बोलूनच नाही, तर कृतीतूनही मला हे दाखवून दिले.'
'जेव्हा मागच्या मालिकेत मी दोनदा शुन्यावर बाद झालेलो, तेव्हा मी परत केरळला जाताना विचार करत होतो की क्या होगा भाई (काय होईल आता)? पण भारतीय संघव्यवस्थापनाने मला या मालिकेसाठी समर्थन दिले आणि मला आनंद आहे की मी माझ्या कर्णधाराला आणि प्रशिक्षकाला आनंदी होण्यासाठी कारण देऊ शकलो. '
सॅमसन जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत सलग दोनदा शुन्यावर बाद झाला होता.
दरम्यान, शनिवारी एकाच षटकात ५ षटकार मारण्याबद्दल सॅमसन म्हणाला, 'माझ्या मेंटॉरने मला सांगितलं होतं की तुला एकाच षटकात ५ षटकार मारायचे आहेत. एकाच षटकात ५ षटकार मारण्यासारखा प्रयत्न मी गेल्या वर्षापासून करत होतो. मी प्रयत्न करत होतो आणि आज ते झाले.'
या सामन्यात भारताने संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर २० षटकात ६ बाद २९७ धावा ठोकल्या होत्या. ही भारताची टी२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारताने दिलेल्या २९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २० षटकात ७ बाद १६४ धावाच करू शकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.