कराची : ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्धचा सामना जिंकण्याची संधी मिळालेली असताना पराभवाचे तोंड पाहायला लावण्याची वेळ आणणाऱ्या पाकिस्तानी संघावर माजी खेळाडू संतापले आहेत. त्यातच माजी कर्णधार शोएब मलिकने तर इमाद वसिमवर अप्रत्यक्षपणे फिक्सिंगचे आरोप केले आहेत. अवघे १२० धावांचे आव्हान असताना दोन बाद ७३ अशी मजल पाकिस्तानने मारली होती; मात्र त्यानंतर जसप्रीत बुमराच्या १५ आणि १९व्या षटकातील माऱ्याने चित्रच पालटले. पाक संघाला २०व्या षटकाअखेर सात बाद ११३ धावाच करता आल्या.
मधल्या फळीतील फलंदाज इमाद वसिमने १५ धावा करण्यासाठी २३ चेंडू घेतले आणि तो अखेरच्या षटकात १७ धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर बाद झाला. इमादची फलंदाजी पाहिली तर तो जाणीवपूर्वक चेंडू वाया घालवत होता, असे जाणवत होते. त्याच्या या पवित्र्यामुळे पाकिस्तान संघासमोरचे आव्हान अधिकच कठीण होत गेले, असे मलिकने म्हटले आहे. त्याने फिक्सिंगचा थेट आरोप केला नसला तरी जाणीवपूर्वक तो चेंडू वाया घालवत होता, असा केलेला आरोप पाक संघात सर्व काही आलबेल नसल्याचे दर्शवत आहे.
पाक संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीनेही असाच आरोप केला आहे. पाक संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये चांगले वातावरण नाही, काही खेळाडूंचे कर्णधार बाबर आझमबरोबर चांगले संबंध नसल्याचे आफ्रिदी म्हणतो. कर्णधार म्हणून तुम्ही सर्व खेळाडूंना एकत्रित ठेवले पाहिजे. तो संघातील वातावरण गढूळ करत आहे. ही विश्वकरंडक स्पर्धा संपू दे, मग मी उघडपणे काही गोष्टी सांगणार आहे, अशी धमकीच आफ्रिदीने दिली.
आत्ताच मी काही बोललो तर मी माझा जावई शहिनशहा आफ्रिदीची बाजू घेत आहे, असे लोक म्हणतील, त्यामुळे मी विश्वकरंडक स्पर्धा संपायची वाट पाहात आहे, असे आफ्रिदी म्हणाला. भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतील अपयशानंतर बाबर आझमला कर्णधारपदावरून दूर करून शहिनशहा आफ्रिदीकडे नेतृत्व देण्यात आले होते; परंतु आता या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अगोदर आफ्रिदीला बाजूला करून पुन्हा बाबर आझमची कर्णधारपदी निवड करण्यात आली.
शोएब अख्तरचेही टीकास्र
पाक संघाच्या या सुमार कामगिरीबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, बाबर आझमचा हा संघ सुपर-८ मध्ये खेळण्याच्या पात्रतेचाच नाही, अशी टीका माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केली आहे. तुम्ही सर्व देशाची मान खाली घालवली आहे. अशी कामगिरी वेदना देणारी आहे. किमान लढण्याची जिद्द तरी दाखवायला हवी होती. त्यामुळे तुम्ही सुपर-८ मध्ये स्थान मिळवण्याच्या पात्रतेचे आहात का, हा प्रश्न स्वतःला विचारा, असे अख्तरने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.