Sri Lanka vs New Zealand 1st Test : श्रीलंकेने पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर ६३ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ३०५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ३४० धावा करून आघाडी घेतली. पण, दुसऱ्या डावात यजमानांनी ३०९ धावा करून किवींसमोर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले. पण, न्यूझीलंडला २११ धावांवरच गाशा गुंडाळावा लागला. Prabath Jayasuriya ने दोन्ही डावांत मिळून ९ ( ४-१३६ व ५-६८) विकेट्स घेतल्या.
कमिंदू मेंडिसच्या ११४ धावांच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या डावात ३०५ धावा केल्या. कुसल मेंडिसने ५० धावा केल्या. किवीच्या विलियम ओ'रौके ने ५५ धावांत ५ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात टॉम लॅथम ( ७०), केन विलियम्सन ( ५५), डॅरिल मिचेल ( ५७), ग्लेन फिलिप्स ( नाबाद ४९) यांच्या खेळीने न्यूझीलंडला ३४० धावांपर्यंत पोहोचवले. प्रभातने ४, रमेश मेंडिसने ३ व धनंजया डी सिल्वाने २ विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेला दुसऱ्या डावात मोठी खेळी करता आली नाही. दिमुथ करुणारत्नेने ८३, दिनेश चंडिमलने ६१ व अँजेलो मॅथ्यूजने ५० धावांची खेळी केली. पण, नंतर डाव गडगडला आणि त्यांना ३०९ धावाच करता आल्या. कर्णधार धनंजयाने ४० धावांचे योगदान दिले. अजाझ पटेलने ६ विकेट्स घेतल्या. किवींसमोर विजयासाठी २७५ धावांचे लक्ष्य ठेवले गेले. पण, किवींना हा भार पेलवला नाही.
प्रभातने उत्तम गोलंदाजी करून ६८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. रमेश मेंडिसने ३ विकेट्स घेतल्या. केन विलियम्सन ( ३०) व टॉम लॅथम ( २८) यांनी चांगली खेळी करण्याचा प्रयत्न केला. टॉम ब्लंडलही ३० धावांपर्यंत थांबला. पण, रचीन रवींद्र एका बाजूने खिंड लढवत होता. संघाला विजयासाठी ८६ धावा हव्या असताना रचीनची विकेट पडली अन् ती किवींची नववी विकेट होती. रचीनने १६८ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारांसह ९२ धावा केल्या. किवींचा दुसरा डाव २११ धावांवर गडगडल्याने लंकेला ६३ धावांनी विजय मिळवता आला.
श्रीलंका-न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटीत एक दिवसाची विश्रांती ठेवली गेली आणि त्यामुळे बऱ्याच वर्षांनी सहा दिवसांची कसोटी पाहायला मिळाली. डेमोक्रॅटिक सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ श्रीलंकेच्या अध्यक्षीय निवडणूक हे २१ सप्टेंबरला विश्रांतीचा दिवस ठरवण्याचं मुख्य कारण होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.