श्रीलंकेत एकदिवसीय मालिका गमावण्याची नामुष्की टाळायची असेल तर भारताच्या प्रतिष्ठीत फलंदाजांना आपले सर्वस्व पणास लावावे लागणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने १-० आघाडी घेतली आहे आणि अखेरचा सामना आज होत आहे.
ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा जिंकल्यानंतर स्वप्नांच्या दुनियेत वावरणाऱ्या भारतीय फलंदाजांना या एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी जमिनीवर आणले. विशेष म्हणजे, कर्णधार रोहित शर्माने विजयी मार्ग तयार केलेला असतानाही मधल्या फळीतील फलंदाजांना या मार्गावर पुढे जाता आले नाही आणि यात विराट कोहलीचाही समावेश आहे.
गौतम गंभीर यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्वेन्टी-२० मालिकेत निर्भेळ यश मिळवले; परंतु विराट कोहलीसारखा फलंदाज खेळत असताना आणि रोहित शर्मा तुफानी फलंदाजी करत असताना पराभवाचा सामना करावा लागणे यावर गंभीर निश्चितच नाराज झाले असणार. आजचा सामना जिंकला नाही तर पहिल्याच जबाबदारीत त्यांच्या नावावर अपयशाचा डाग लागेल.
१९९७ मध्ये पराभव
१९९७ मध्ये अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या श्रीलंका संघाविरुद्ध भारताचा ०-३ असा पराभव झाला होता. सचिन तेंडुलकर त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार होता. त्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध ११ मालिका खेळला त्या सर्व जिंकलेल्या आहेत.
पहिला सामना टाय झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताला ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे आता भारत ही मालिका जिंकू शकत नाही. किमान १-१ अशा बरोबरीत सोडवण्यासाठी प्रामुख्याने फलंदाजांना जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.
भरवशाचा आणि सुपरस्टार विराट कोहली संघाला गरज असताना दोन सामन्यांत मिळून केवळ ३८ धावाच करू शकलेला आहे. त्याने किती धावा केल्या यापेक्षा तो ज्या पद्धतीने बाद झाला आहे ते चिंता करणारे आहे. पहिल्या सामन्यात तो वानिंदू हसरंगासमोर तर दुसऱ्या सामन्यात जेफ्रीसमोर बाद झालेला आहे. याच मैदानावर कोहलीने चार शतके केलेली आहेत; पण आता फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्ट्या आणि श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज यांचे कोडे त्याला सोडवता आलेले नाही.
दुबेऐवजी पराग?
पहिल्या दोन सामन्यांत भारताने बदल केले नाहीत; पण आता खेळपट्टीचे एकूणच स्वरूप पाहता शिवम दुबेऐवजी रियान परागला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. ट्वेन्टी-२० मालिकेत परागने फिरकी गोलंदाजीतही चमक दाखवली होती.
श्रेयस अय्यर आणि केएल राहुल बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघात खेळत आहेत; पण त्यांनीही निराशा केलेली आहे. आपले स्थान येणाऱ्या मालिकांमध्ये कायम ठेवायचे असेल तर आता आपली उपयुक्तता सिद्ध करावीच लागेल. वास्तविक पहिल्या दोन सामन्यांत संघाला गरज असताना या दोघांपैकी एकाने अखेरपर्यंत मैदानावर राहण्याची गरज होती. विशेष म्हणजे, फिरकी गोलंदाजांसमोर आत्मविश्वासाने खेळणारे फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
हर्षित राणाला संधी मिळणार?
वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा संघातील नवा चेहरा आहे. आजच्या सामन्यात खलील अहमदऐवजी त्याला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. शिवाय तो बऱ्यापैकी फलंदाजीही करू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.