Women's Asia Cup, India vs UAE: महिला आशिया कप २०२४ स्पर्धेत रविवारी (२१ जुलै) भारताचा दुसरा सामना संयुक्त अरब अमिराती (UAE) संघाविरुद्ध खेळवला जात आहे. डंबुला येथे होत असलेल्या या सामन्यात भारतानं युएईसमोर २०२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी २० षटकात ५ बाद २०१ धावा केल्या. भारताकडून हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष यांनी अर्धशतके झळकावली.
या सामन्यात युएईने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. भारताने स्मृती मानधनाची विकेट तिसऱ्याच षटकात गमावली. ती १३ धावांवर बाद झाली.
त्यानंतर पॉवरप्ले संपण्याच्या आधीच आक्रमक खेळणारी शफाली वर्मा आणि दयालन हेमलता बाद झाली. शफालीने १८ चेंडूत ३७ धावा केल्या. तसेच हमलताने २ धावा केल्या. पण त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने जेमिमाह रोड्रिग्ससह डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली.पण जमिमाह १४ धावा करून बाद झाली. परंतु, यानंतर यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोषने हरमनप्रीतची चांगली साथ दिली.
ऋचाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. ती साथीला असताना हरमनप्रीतने आपले अर्धशतकही पूर्ण केले. हरमनप्रीत आणि ऋचा यांच्यात ७५ धावांची भागीदारीही झाली. परंतु, अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हरमनप्रीत दुर्दैवानं धावबाद झाली. तिने ४७ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ६६ धावांची खेळी केली.
ती बाद झाल्यानंतर मात्र ऋचाने पुढच्या पाचही चेंडूवर चौकार ठोकले आणि भारताला २०० धावांचा टप्पाही पार करून दिला. यासह तिने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील तिचे पहिले अर्धशतकही पूर्ण केले. ऋचा २९ चेंडूत ६४ धावांवर नाबाद राहिली. तिने १२ चौकार आणि १ षटकार मारला.
युएईकडून काविशा इगोडागेने २ विकेट्स घेतल्या. तसेच समायरा धंधारका आणि हीना होतचंदानी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.