Ind vs Eng Test sakal
क्रिकेट

Ind vs Eng Test : भारतीयांचा इंग्लंडवर उलटवार ; सिराजच्या चार विकेट, तर यशस्वीचा शतकी हल्लाबोल

भारतीय गोलंदाजांविरुद्ध धावांची लयलूट करत शतकी दरोडा भले बेन डकेटने टाकला असेल; परंतु याच गोलंदाजांनी जबरदस्त उलटवार केला.

सकाळ वृत्तसेवा

राजकोट : भारतीय गोलंदाजांविरुद्ध धावांची लयलूट करत शतकी दरोडा भले बेन डकेटने टाकला असेल; परंतु याच गोलंदाजांनी जबरदस्त उलटवार केला. मोहम्मद सिराजने चार विकेटने सुरुंग लावला. त्यानंतर यशस्वी जयस्वालने नाबाद शतकाचा हल्लाबोल केला. त्यामुळे भारताने २ बाद १९६ अशी मजल मारत ३२२ धावांची आघाडी घेतली आहे.

राजकोटच्या नव्याने नामकरण करण्यात आलेल्या निरंजन शहा मैदानावर नाट्य घडू लागले आहे. कुटुंबात वैद्यकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यामुळे रविचंद्रन अश्विन घरी परतला आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणाचा अपवाद वगळता केवळ दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या भारतीय संघाने तेवढाच तडफदार खेळ करत या तिसऱ्या कसोटी सामन्यावर पकड मिळवली आहे.

बेन डकेट नाबाद १३३ आणि इंग्लंड २ बाद २०७ अशा सुस्थितीत पाहुण्यांची आज डाव सुरू केला तेव्हा वर्चस्वाची सुई त्यांच्याकडे पूर्णपणे झुकलेली होती. पण डकेट १५३ धावांवर बाद झाला. त्यानंतर सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी इंग्लंडचे अखेरचे ६ फलंदाज २० धावांत बाद केले. त्यामुळे ४ बाद २२५ वरून इंग्लंडचा डाव ३१९ धावांवर संपुष्टात आला आणि भारताच्या हाती १२६ धावांची चांगली आघाडी लागली.

अश्विन चेन्नईला परतल्यामुळे भारतीय संघाला चार गोलंदाजांसह खेळावे लागणार होते. इंग्लंडचे फलंदाज त्याच गोष्टीचा फायदा घेत मोठी धावसंख्या उभारणार असा अंदाज बहुतेकांनी व्यक्त करून टाकला होता. बेन डकेटने खेळ पुढे चालू करताना आक्रमणाचा इशारा परत दिला. कोणतीही गरज नसताना ज्यो रूटला बुमरा गोलंदाजी करत असताना रिव्हर्स स्कूपचा फटका मारायची अवदसा आठवली.

रूटचा उडालेला झेल स्लिपमधल्या जयस्वालने पकडला. थोड्या वेळाने दीड शतक करून बेन डकेट बाद झाला. काही चांगल्या चेंडूंवर डकेट चकला आणि बाद मात्र कुलदीप यादवच्या एकदम साध्या चेंडूवर झाला. उपाहारापर्यंत कुलदीप यादवने एका बाजूने १२ षटके सतत गोलंदाजी केली आणि २ प्रमुख फलंदाजांना बाद केले. त्याच्या गोलंदाजीत फलंदाजांच्या मनात शंका निर्माण करायचे कौशल्य दिसले.

खेळाला नाट्यमय कलाटणी उपाहारानंतर मिळाली, जेव्हा ४१ धावांवर झकास फलंदाजी करत असलेल्या बेन स्टोकस् जडेजाचा चेंडू प्रेक्षकांत भिरकावण्याचा मोह झाला. बुमराने स्टोक्सचा झेल पकडला आणि इंग्लंडच्या फलंदाजीला गळती लागली. महंमद सिराजने चतुराईने मारा करताना चेंडूचा वेग बदलता ठेवला. तीन फलंदाजांना बाद करून सिराजने इंग्लंड संघाच्या डावाला धक्का दिला. ५ बाद २९९ वरून २० धावांमध्ये ६ फलंदाज बाद तंबूत परतले आणि इंग्लंडचा डाव ३१९ धावांवर संपला. भारतीय संघाच्या हाती १२६ धावांची चांगली आघाडी लागली.

हातची संधी दवडल्याची नाराजी तोंडावर बाळगत इंग्लंडचा संघ परत मैदानात आला. ज्यो रूटला स्वीपचा फटका मारताना रोहित चुकला आणि पायचित झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वालने सूत्र हाती घेतली. शुभमन गिलसोबत शतकी भागीदारी करताना जयस्वालने विशेष करून फिरकी गोलंदाजांवर बेधडक मोठे फटके मारले. पुढे सरसावत मारलेले षटकार असो वा रिव्हर्स स्वीपचा वापर करत मारलेले चौकार असो, सगळेच आक्रमण प्रेक्षकांना आवडत होते. मोठ्या झोकात यशस्वी जयस्वालने आपले शतक १२२ चेंडूंत ९ चौकार आणि ५ दणदणीत षटकारांसह साजरे केले.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव : ४४५.

इंग्लंड, पहिला डाव : ३१९ (बेन डकेट १५३ - १५१ चेंडू, २३ चौकार, २ षटकार, ऑली पोप ३९, ज्यो रूट १०, बेअरस्टॉ ०, बेन स्टोक्स ४१, बेन फोक्स १३, अवांतर २० (५ पेनल्टी धावांसह). जसप्रीत बुमरा १५-१-५४-१, मोहम्मद सिराज २१.१-२-८४-४, कुलदीप यादव १८-२-७७-२, आर. अश्विन ७-०-३७-१, रवींद्र जडेजा १०-०-५१-२).

भारत, दुसरा डाव : ५१ षटकांत २ बाद १९६ (यशस्वी जयस्वाल जखमी निवृत्त १०४ - १३३ चेंडू, ९ चौकार, ५ षटकार, रोहित शर्मा १९, शुभमन गिल खेळत आहे ६५ - १२० चेंडू ६ चौकार २ षटकार रजत पाटिदार ०, कुलदीप यादव खेळत आहे ३, ज्यो रूट १४-२-४८-१, टॉम हार्टली १५-२-४२-१)

जयस्वाल जखमी निवृत्त

१०४ धावांवर खेळत असताना पाठीच्या खालच्या भागात चमक भरत असल्याने जयस्वाल तंबूत परतला. खराब फटका मारून बाद झाल्याने रजत पाटीदारने अजून एक संधी गमावली.

यशस्वी जयस्वाल

  • १०४ धावा

  • १३३ चेंडू

  • ९ चौकार

  • ५ षटकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT