चेन्नई : अवघ्या १७व्या वर्षी बुद्धिबळ जगतात विश्वविक्रम घडवणाऱ्या डी. गुकेशवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे; परंतु या लहान वयात थक्क करणाऱ्या त्याच्या भरारीमध्ये आई- वडिलांचा मोठा त्याग आहे. आपल्या मुलाला घडवण्यासाठी आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी जमवलेली सर्व पुंजी रिकामी केली.
गुकेशचे वडील डॉ. रजनिकांत नाक-कान-घसा तज्ज्ञ तर आई पद्मा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहे. विविध बुद्धिबळ स्पर्धांसाठी जगभरात सतत प्रवास करावा लागत असल्यामुळे डॉ. रजनिकांत यांनी २०१७-१८ मध्येच आपला डॉक्टरी व्यवसाय थांबवला. १२व्या वर्षीच गुकेश ग्रँडमास्टर झाला, त्यावेळी आई पद्मा यात कमवत्या होत्या आणि त्यांच्या उत्पन्नावरच घरखर्च होत होता.
गुकेशच्या यशामागील आई-वडिलांच्या या त्यागाची माहिती त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक विश्नू प्रसन्ना यांनी दिली. गुकेश डॉक्टर कुटुंबात जन्मलेला असला तरी त्याचा ओढा ६४ घरांच्या बुद्धिबळ पटावरच होता. आपल्या मुलाचे हे पॅशन पाहून आई- वडिलांनी बुद्धिबळातच त्याला कारकिर्द घडण्यास प्रोत्साहन दिले ते इतके की पाचवीनंतर त्याला पूर्ण वेळ शाळेत जाण्यापासून थांबवले. त्यानंतर तो कोणतीही शालेय परीक्षा देऊ शकलेला नाही. यापुढे तो शालेय शिक्षण पूर्ण करेल की नाही, याबाबत शंका आहे; परंतु त्याबद्दल त्याची आई मात्र चिंतेत आहे, असे प्रसन्ना यांनी सांगितले.
बक्षीस रकमेवर खर्च अवलंबून
उदयोन्मुख बुद्धिबळपटू असा लौकिक मिळवला असला तरी १७ वर्षीय गुकेशला कोण प्रायोजक मिळणार, त्यामुळे विविध स्पर्धा जिंकून मिळालेल्या बक्षीस रकमेवर त्याचा इतर खर्च केला जात आहे.
कमालीचा ध्यास
गुकेशमध्ये कमालीचा ध्यास आहे. त्याची शिकण्याची वृत्ती आणि प्रगती करण्याची इच्छाशक्ती अफलातून आहे. इतर जण जो विचार करतात त्याच्या पलिकडे जाऊन विचार करण्याची क्षमता गुकेशमध्ये आहे, असे प्रसन्ना म्हणतात.
असा सुरू झाला प्रवास
वयाच्या सातव्या वर्षापासून तो बुद्धिबळ खेळू लागला आणि २०१७ मध्ये माझ्याकडे आहे. तो इंटरनॅशनल मास्टर्सचे नॉर्म मिळवू लागला आणि तेथूनच त्याचा प्रवास सुरू झाला. दोन वर्षातच तो ग्रँडमास्टरही झाला, अशी माहिती प्रसन्ना यांनी दिली.
आनंदच्या अकादमीत सराव
ते पुढे म्हणतात, कोरोनापर्यंत आम्ही कठोर मेहनत घेत होतो, त्यानंतर कोरोना काळात आम्ही विश्वनाथन आनंद यांच्या अकादमीत होतो तेव्हा मिळालेल्या वेळेचा पुरेपूर उपयोग केला. हळूहळू त्याने रेटिंग गुण वाढवत नेले. सध्या त्याचे २७४३ रेटिंग गुण आहेत. मात्र, गेल्या सप्टेंबर महिन्यात त्याने २७५८ रेटिंगची मजल मारली होती.
ऑलिंपियाचे सुवर्ण
बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये मिळलेले सुवर्णपदक ही गुकेशची मोठी कमाई होती. आता मात्र त्याने आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा जिंकून मोठी भरारी घेतली आहे, असे प्रसन्ना यांनी सांगितले. २७४३ रेटिंगमुळे गुकेश आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशनच्या (फिडे) रँकिंगमध्ये १६व्या स्थानावर आहे; पण त्याने याअगोदर आठव्या स्थानापर्यंत मजल मारलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.