सलामीवीर डेवोन कॉन्वेनं (Devon Conway) पहिला दिवस गाजवला. त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा 25 विक्रम मोडीत काढला आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने शतकी खेळी करुन संघाचा डाव सावरला.
England vs New Zealand, 1st Test : क्रिकेटच्या पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात (Lord's, London ) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या न्यूझीलंडच्या सलामीवीर डेवोन कॉन्वेनं (Devon Conway) पहिला दिवस गाजवला. त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा 25 विक्रम मोडीत काढला आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने शतकी खेळी करुन संघाचा डाव सावरला.
इंग्लंड दौऱ्यापूर्वी कॉन्वेनं खेळपट्टीवर कचरा टाकून प्रॅक्टिस केली होती. कचरा टाकलेल्या खेळपट्टीवर सराव केल्यामुळे इंग्लंडमध्ये फिरकीचा सामना करणे सोपे जाईल, या हेतून त्याने हटके पद्धतीने सराव केला होता. सरावामुळे चर्चेत आलेल्या कॉन्वेनं डेब्यू सामन्यात शतक झळकावून कठोर परिश्रमाची झलक दाखवून दिलीये.
इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या ओली रॉबिनसन याच्या गोलंदाजीवर चौकार खेचून 163 चेंडूचा सामना करत त्याने कसोटीतील पहिल्याच सामन्यात शतकी खेळी पूर्ण केली. दिवसाअखेर 240 चेंडूत 16 चौकाराच्या मदतीने त्याने नाबाद 136 धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. टॉम लॅथमसोबत कॉन्वेन न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी रचली. 16 व्या षटकात इंग्लंडकडून पदार्पण केलेल्या ओली रॉबिनसन याने संघाला पहिले यश मिळवून दिले. टॉम लॅथम 23 धावा करुन माघारी फिरला. त्याने 57 चेंडू खेळताना त्याने दोन चौकार खेचले. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेला कॅप्टन केन विल्यमसनला अँडरसनने स्वस्तात माघारी धाडले. तो केवळ 13 धावांची भर घालून परतला. रॉस टेलर 14 धावा करुन तंबूत परतला. एका बाजूने विकेट पडत असताना पहिला सामना खेळणाऱ्या डेवोन कॉन्वेनं संयमी खेळ करुन संघाचा डाव सावरला.
क्रिकेटच्या पंढरीत पदार्पणात शतकी करणारा कॉन्वे हा तिसरा परदेशी खेळाडू आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी केली होती. गांगुलीने 301 चेंडूत 131 धावा केल्या होत्या. यात 20 चौकारांचा समावेश होता. 1996 मध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामना ड्रॉ राहिला होता.
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटर हॅरी ग्रॅहम (Harry Graham) लॉर्ड्सवर शतकी खेळी करणारे पहिले परदेशी फलंदाज आहेत. 1893 मध्ये त्यांनी क्रिकेटच्या पंढरीत पदार्पणाचा सामना खेळला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना देखील ड्रॉच राहिला होता. कॉन्वेच्या शतकी खेळीनंतर इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्याचा निकाल काय लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.