डॉर्टमंड : सामन्यातील नऊ मिनिटे शिल्लक असताना मैदानात उतरलेला बदली खेळाडू ऑली वॉटकिन्स याच्या शानदार गोलमुळे इंग्लंडने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. भरपाईवेळेत आघाडी घेत गतउपविजेत्यांनी नेदरलँड्सची झुंज २-१ फरकाने मोडून काढली.
झावी सिमॉन्स याने सातव्या मिनिटास नेदरलँड्ससाठी आघाडीचा गोल केल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याने पेनल्टी फटक्यावर १८व्या मिनिटास बरोबरीचा गोल केला होता. भरपाई वेळेतील पहिल्या मिनिटास वॉटकिन्सचा गोल निर्णायक ठरला आणि इंग्लंडने अंतिम फेरीत स्पेनविरुद्ध लढत निश्चित केली. विजेतेपदासाठी आता बर्लिन येथे रविवारी (ता. १४) मध्यरात्र उलटल्यानंतर सामना होईल. नेदरलँड्सविरुद्ध निर्णायक गोल करणारा वॉटकिन्स सामन्याचा मानकरी ठरला.
इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांनी थकलेल्या पायांना विश्रांती देताना ८१व्या मिनिटास कर्णधार हॅरी केन याच्या जागी वॉटकिन्स याला, तर फिल फॉडेन याच्या जागी कोल पामर याचा पाचारण केले. साऊथगेट यांची ही चाल कमालीची यशस्वी ठरली. ९०+१व्या मिनिटास पामर याच्याकडून मिळालेल्या पासवर ॲस्टन व्हिला क्लबकडून खेळणाऱ्या २८ वर्षीय वॉटकिन्सने चेंडूला अचूकपणे गोलजाळीच्या कोपऱ्यात मारले.
त्यापूर्वी, सामन्याच्या सातव्याच मिनिटास इंग्लंडला जोरदार धक्का बसला. २१ वर्षीय झावी सिमॉन्स याने इंग्लंडचा गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्ड याचा बचाव भेदल्यामुळे नेदरलँड्सने आघाडी प्राप्त केली; पण इंग्लंड संघ जास्त काळ पिछाडीवर राहिला नाही.
नेदरलँड्सच्या डेन्झेल डमफ्रीसच्या याने हॅरी केन याला चुकीच्या पद्धतीने अडथळा आणला, त्यावेळी व्हिडीओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) पडताळणीनंतर इंग्लंडला पेनल्टी फटका बहाल करण्यात आला. हॅरी केन याने एकाग्रतेसह प्रतिस्पर्धी गोलरक्षक बार्ट व्हरब्रुगन याला चकवा देत इंग्लंडला १-१ अशी बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात बुकायो साका याचा गोल व्हीएआरद्वारे अवैध ठरल्यामुळे इंग्लंडला आघाडीसाठी भरपाई वेळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याचे यंदा युरो करंडकात तीन गोल, स्पर्धेच्या बाद फेरी टप्प्यात सर्वाधिक सहा गोल करणारा पहिला खेळाडू
इंग्लंडचे गॅरेथ साऊथगेट हे युरो करंडकात सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणारे तिसरे प्रशिक्षक, यापूर्वी जर्मनीचे हेल्मट शॉन (१९७२-१९७६) व बेर्टी फॉक्टस (१९९२-९६)
यावेळच्या युरो करंडकात इंग्लंडचा सलग तिसऱ्या लढतीत पिछाडीवरून विजय
युरो करंडक स्पर्धेत गोल करणारा झावी सिमॉन्स (२१ वर्षे व ८० दिवस) नेदरलँड्सचा दुसरा युवा खेळाडू, सर्वांत युवा पॅट्रिक क्लुईव्हर्ट (१९ वर्षे व ३५३ दिवस, १९९६)
त्या क्षणाची मी कित्येक आठवडे वाट पाहत होतो. आज मी जेथे आहे, तेथे येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. मिळालेल्या संधीचा मी दोन्ही हातांनी लाभ उठविला.
-ऑली वॉटकिन्स, इंग्लंडचा फुटबॉलपटू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.