Argentina vs Croatia FIFA World Cup 2022 : फिफा विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीच्या लढतींचा संघर्ष उद्यापासून सुरू होईल. लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना संघ पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत लुका मॉड्रिचच्या क्रोएशियाशी दोन हात करणार आहे. अर्जेंटिनाने १९८६ नंतर अर्थातच ३६ वर्षे उलटून गेल्यानंतरही विश्वकरंडक जिंकलेला नाही. ख्रिस्तियानो रोनाल्डोप्रमाणे आपलेही स्वप्न अधुरे राहू नये यासाठी मेस्सी उद्या फुटबॉलच्या रणांगणात प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. क्रोएशियाला मागच्या विश्वकरंडकात फ्रान्सकडून पराभूत व्हावे लागल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, पण यंदा पुन्हा एकदा त्यांच्याकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे. याप्रसंगी क्रोएशियाला पहिल्यावहिल्या आणि अर्जेंटिनाला तिसऱ्या जेतेपदाचा ध्यास लागून राहिला आहे.
अर्जेंटिनाचा साखळी फेरीच्या लढतीत क गटात समावेश होता. अर्जेंटिनाने दोन विजयांसह ६ गुणांची कमाई करीत पहिले स्थान पटकावले. सौदी अरेबियाविरुद्धच्या पराभवानंतरही अर्जेंटिनाने झोकात पुनरागमन करीत बाद फेरी गाठली. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय साकारला. नेदरलँड्सविरुद्धच्या रोमहर्षक लढतीत मेस्सीच्या संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असा विजय संपादन केला आणि अंतिम चारमध्ये प्रवेश केला.
क्रोएशियाचा फ गटात समावेश होता. साखळी फेरीत मोरोक्को व बेल्जियम यांच्याविरुद्ध लढतीत क्रोएशियाने पराभव टाळला. बरोबरीवर त्यांना समाधान मानावे लागले, पण कॅनडाचा ४-१ असा धुव्वा उडवल्यामुळे त्यांना बाद फेरीत पोहोचता आले. क्रोएशियाच्या संघाला मागील विश्वकरंडकाप्रमाणे याही स्पर्धेमध्ये बाद फेरीत विजयासाठी पेनल्टी शूटआऊटपर्यंत वाट बघावी लागत आहे. आधी जपानवर ३-१ आणि त्यानंतर बलाढ्य ब्राझीलवर ४-२ असा विजय मिळवत क्रोएशियाने जेतेपद पटकावण्याच्या दिशेने कूच केली.
मॉड्रिच, पेरीसीच, ब्रोझोविच, कोवासिचवर मदार
क्रोएशियाकडून या स्पर्धेमध्ये सर्वाधिक दोन गोल आंद्रेज क्रॅमारीच याने केले आहेत, पण या संघामध्ये लुका मॉड्रिच, इवान पेरीसीच, मार्सेलो ब्राझोविच व मॅटियो कोवासिच या खेळाडूंनी संघाच्या भरारीत मोलाचे योगदान दिले आहे. मॉड्रिच हा संघाचा कणा आहे. मॉड्रिचने २६ क्रॉस दिले आहेत. मार्सेलो ब्रोझोविचने सर्वाधिक ४७० पासेस दिले आहेत. एवढेच नव्हे, तर ७१.९५ किमी तो धावला आहे. पेरीसीच १४ वेळा गोलला टार्गेट केले आहे.
समसमान इतिहास...
अर्जेंटिना-क्रोएशिया यांच्यामधील विश्वकरंडकातील लढतींवर नजर टाकता, दोन्ही संघांनी समसमान कामगिरी केल्याचे प्रकर्षाने दिसून येईल. दोन देशांमध्ये विश्वकरंडकातील आतापर्यंत झालेल्या लढतींमध्ये अर्जेंटिना आणि क्रोएशिया दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे, तसेच दोन लढती बरोबरीत राहिल्या आहेत. अर्जेंटिनाने १९९८ मधील लढतीत क्रोएशियावर १-० असा विजय साकारला होता, तसेच २०१८मधील लढतीत क्रोएशियाने अर्जेंटिनावर ३-० अशी मात केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.