अल खोर : हॅरी केनच्या नेतृत्वात मैदानात उतरणारा इंग्लंडचा फुटबॉल संघ उद्या फिफा विश्वकरंडकातील ‘ब’ गटाच्या लढतीत अमेरिकेशी दोन हात करणार आहे. सलामीच्या लढतीत इराणचा ६-२ असा धुव्वा उडवणाऱ्या इंग्लंड संघाचे ध्येय आता अंतिम १६ अर्थातच बाद फेरी गाठण्याचे असणार आहे. अमेरिका व वेल्स यांच्यामधील लढत बरोबरीत राहिल्यामुळे अमेरिकेसाठी उद्याच्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक असणार आहे, अन्यथा इतर लढतींच्या निकालावर त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.
इंग्लंडने पहिल्या लढतीत इराणवर दणदणीत विजय मिळवला खरा, पण या लढतीत त्यांचा प्रमुख खेळाडू हॅरी केन याला दुखापत झाली. त्यामुळे उत्तरार्धात त्याला बाहेर जावे लागले. केनच्या दुखापतीबाबत मुख्य प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट म्हणाले, केनची दुखापत गंभीर नाही. अमेरिकेविरुद्धच्या लढतीत तो खेळणार आहे. केनच्या दुखापतीमध्ये सुधारणा होत आहे, ही बाब इंग्लंड संघासाठी आनंदाची असेल.
इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा ४-३-३ या कॉम्बिनेशनने मैदानात उतरील. जॉर्डन पिकफोर्ड गोलरक्षकाची भूमिका बजावेल. ल्यूक शॉ, जॉन स्टोन्स, हॅरी मॅग्वायर, कायरॅन ट्रिपीयर हे खेळाडू बचावफळीत गोलचा बचाव करतील. डेक्लन राईस, मॅसन माऊंट व ज्युड बेलिंघम हे मधल्या फळीत आपली चुणूक दाखवतील.
दृष्टिक्षेपात
हॅरी केनने आतापर्यंत इंग्लंडसाठी ५१ गोल केले आहेत. वेन रुनीच्या ५३ गोलची बरोबरी करण्यासाठी त्याला आणखी २ गोल करण्याची गरज आहे.
इंग्लंडच्या संघाने २०१८ मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. तसेच २०१० मध्ये त्यांचा संघ अंतिम १६ फेरीमध्ये पोहोचला होता.
अमेरिकेचा संघ २०१८ मधील विश्वकरंडकासाठी पात्र ठरला नव्हता.
अमेरिकेने १९३० मध्ये झालेल्या विश्वकरंडकात उपांत्य फेरी गाठली होती.
आजच्या ‘ब’ गटातील लढती
वेल्स - इराण, अल रयान
दुपारी ३.३० वाजता
इंग्लंड - अमेरिका, अल खोर
मध्यरात्री १२.३० वाजता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.