French Open 2021 Final : अखेरच्या तीन सेटमध्ये नावाला साजेसा खेळ करत सर्बियाच्या नंबर वन नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) लाल मातीत दुसरी फायनल जिंकली. त्याची आतापर्यंत जिंकलेली ही 19 वी ग्रँडस्लॅम स्पर्धा ठरली. ग्रँडस्लॅमची पहिली फायनल खेळणाऱ्या ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने पहिले दोन सेट जिंकून जोकोविचला बॅकफूटवर ढकलले होते. फ्रेंच ओपनमधील जोकोविचची निराशजनक कामगिरी कायम राहणार, असे चित्र यामुळे दिसू लागले. पण जोकोविचने कमालीचे कमबॅक करत सामन्याला कलाटणी दिली. त्याने नवख्या स्टेफानोस त्सित्सिपास (Stefanos Tsitsipas) याला 6-7(6), 2-6, 6-3, 6-2, 6-4. असे पराभूत केले. (French Open 2021 Final Novak Djokovic Win 19th Grand Slam Title While Stefanos Tsitsipas Loss First Majors Trophy Dream)
टेनिस जगातातील नंबर वन नोवाक जोकोविच आणि पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची फायनल खेळणाऱ्या ग्रीसचा पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यात शेवटपर्यंत संघर्षमय लढत पाहायला मिळाली. पहिल्या सेटमध्ये पाँइट घेण्यात स्टेफानोस त्सित्सिपास हा 18 ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचच्या एक पाउल पुढे होता. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी पडत-झडत एकमेकांविरुद्ध तगडी फाईट दिल्याचे पाहायला मिळाले.
आपली पहिली ग्रँडस्लॅम खेळणाऱ्या स्टेफानोसने पहिला आणि दुसरा सेट जिंकून 'नवा गडी नव राज्य' हे चित्र पाहायला मिळणार याचे संकेत दिले. पण त्यानंतर सर्बियाच्या अनुभवी खेळाडून पिछाडीवरुन दमदार कमबॅक केले. तिसरा आणि चौथा सेट जिंकून त्याने लढतीतील चुरस आणखी वाढवली. अखेरच्या सेटमध्ये जोकोविचने आघाडी घेतली. स्टेफानोस त्सित्सिपास काही सुरेख फटके खेळत त्याला कडवी झुंज दिली. पण अखेर जोकोविचनेच बाजी मारली.
यापूर्वी जोकोविचने 2012, 2014, 2015, 2016 आणि 2020 मध्येही फ्रेंच ओपनची फायनल गाठली होती. यात त्याला तीनवेळा नदालने पराभूत केले होते. 2015 मध्ये त्याला वॉरिंकानं पराभूत केले. 2016 मध्ये अँड्रे मरेला पराभूत करत जोकोविचने पहिली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आता त्याने नवख्या स्टेफानोस त्सित्सिपासला पराभूत करत दुसऱ्यांदा लाल मातीत आपला तोरा दाखवून दिला. आतापर्यंतच्या कारकिर्दीतील त्याचे हे 19 वे ग्रँडस्लॅम असून राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्या विक्रमी ग्रॅडस्लॅमची बरोबरी करण्यासापासून तो आता एक पाउल दूर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.