Hardik Pandya Chetan Sharma Controversy : भारताने पुन्हा एकदा वर्ल्डकपमध्ये कच खाल्यानंतर बीसीसीआय सुपर अॅक्शन मोडमध्ये आलेली आहे. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघ 10 विकेट्सनी हरल्यानंतर बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची बैठक घेतली होती. त्यानंतरच टी 20 च्या संघात मोठे बदल होतील अशी शक्यता निर्माण झाली. सर्वत्र पहिल्याच प्रयत्नात आयपीएल जिंकणाऱ्या हार्दिकच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडणार अशी चर्चा सुरू झाली. त्यातच बीसीसीआयने 18 नोव्हेंबरला रात्री एक मोठा बॉम्ब टाकत या चर्चांना एकप्रकारे पुष्टी दिली. बीसीसीआयने एक नाही दोन नाही तर संपूर्ण निवडसमितीच बर्खास्त करून टाकली.
दरम्यान, चेतन शर्मांच्या नेतृत्वातील निवडसमिती बर्खास्त झाल्यानंतर चेतन शर्मांनी आपल्या कार्यकाळात घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांची किंवा त्यांच्या निर्णयांमुळे निर्माण झालेल्या वादांचीचर्चा सुरू झाली. यात खूप जणांची कर्णधार म्हणून चाचपणी करणे, विराट कोहलीचे प्रकरण व्यवस्थित न हाताळणे, रोटेशन पॉलिसी, दुखापतग्रस्त खेळाडूंबाबतची भुमिका यांचा समावेश आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत एक गोष्ट मात्र फार चर्चेत येत आहे. ती म्हणजे हार्दिक पांड्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडणार असतानाच चेतन शर्मांची गच्छंती होणे. बीसीसीआयमध्ये जरी अध्यक्ष सर्वश्रेष्ठ असला तरी सगळ्या पॉवर या सचिवांनाच असतात. बीसीसीआयचे सचिव कोण आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तुम्ही क्रोनोलॉजी समजून घ्या.
आता जरी हार्दिक पांड्या सर्वांच्या गळ्यातील ताईद झाला असला, त्याची तुलना कूल धोनी सोबत केली जात असेल तरी 2022 च्या आयपीएल हंगामापूर्वी हार्दिक पांड्या हा पिकलं पान, संपलेला खेळाडू होता. या काळात हार्दिकची सर्वात निगेटिव्ह इमेज ही निवडसमितीसोबतच्या वादामुळे निर्माण झाली होती. हे प्रकरण चेतन शर्मांना व्यवस्थित हाताळता आले नाही. त्यांनी आणि निवडसमितीमधील सदस्यांनी हार्दिकच्या फिटनेसचा विषय माध्यमांमध्ये जाहीरपणे चघळला.
निवडसमिताला हार्दिकच्या दुखापतीबद्दल काहीच माहिती नाही असं चित्र माध्यमांसमोर गेलं. यावरून निवडसमिती आणि हार्दिकमध्ये संवादच नसल्याचे दिसून आले. हार्दिक पांड्या रणजी ट्रॉफी खेळत नाही आम्ही कसोटीत त्याचा कसा विचार करणार? हार्दिक पांड्या आपल्या दुखापतीबद्दल काही सांगत नाही, एनसीएमध्ये उपचार घेण्याऐवजी मुंबई इंडियन्सच्या लोकांकडून रिहॅबिलिटेशन करून घेत आहे. अशी हार्दिकबद्दल वक्तव्य येत होती. ही निवडसमितीकडूनच थेट येत असल्याने हार्दिक हा उद्धट खेळाडू आहे. कमी वयात पैसा मिळाल्याने काही भरीव कामगिरी न करता त्याच्या डोक्यात हवा गेली आहे अशी त्याची प्रतिमा तयार झाली होती.
दरम्यान, हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत पहिल्याच हंगामात त्यांना विजेतेपद मिळवून दिले. दरम्यान, तो थोडीफार गोलंदाजी देखील करू लागला. यामुळे हार्दिकला लोकांनी लगेचच डोक्यावर घेतलं. त्याच्या दबावाच्या वेळी कूल दिसण्याची तुलना धोनीशी करण्यात येऊ लागली. त्यामुळे वर्ल्डकपपूर्वीच टी 20 चा पुढचा कर्णधार हार्दिकच अशी चर्चा सुरू झाली. छोट्या दौऱ्यात का असेना निवडसमितीने देखील त्याला संघाच्या नेतृत्वाची संधी दिली. त्यात वर्ल्डकपमध्ये भारताचा इंग्लंडकडून दारूण पराभव झाला. त्यानंतर संघात बदलाचे वारे अधिकच जोर धरू लागले. बीसीसीआयने हार्दिकवर जाहीर टीका करणाऱ्या निवडसमितीला घरचा रस्ता दाखवल्याने एक प्रकारे हार्दिकच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाल्याचे संकेतच मिळत आहेत. आता पुढची घोषणा याचीच होण्याची दाट शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.